घर Politics ‘माझ्यावर नाही चालत ईडी, सीबीआयचा दबाव’

‘माझ्यावर नाही चालत ईडी, सीबीआयचा दबाव’

383
0

राहुल गांधी यांनी उडविली मोदी यांची खिल्ली

डेहराडून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की प्रत्येकजण त्यांना घाबरतो, मात्र, मी त्यांना घाबरत नाही. उलट त्यांना बघून मला हसू येते, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांची खिल्ली उडविली. एका मुलाखतीत मोदी म्हणाले होते की, राहुल कोणाचे ऐकत नाहीत. त्याचा अर्थ सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)चा दबाव राहुलवर कमला येत नाही, असा दावाही त्यांनी केला.

या देशात गरिबांना स्थान नाही. चीनने भारताची भूमी हडप केली. मात्र, नरेंद्र मोदी त्यावर मूग गिळून गप्पा आहेत. मोदींनी नोटाबंदी करून देश उद्ध्वस्त केला आहे. नोटाबंदी झाली तेव्हा कोणी अब्जाधीश रांगेत उभा होता का? काळा पैसा थांबला का? मोदींनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करून व्यवसाय बंद पाडले, त्यामुळे तरुण बेरोजगार झाले. कोरोना आला तेव्हा मोदी म्हणाले ताट वाजवा, मोबाईलचा दिवा लावा, हे मोदींचे खरे स्वरूप आहे, अशा शब्दात गांधी यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

कोरोनामध्ये व्हेंटिलेटर, औषध, ऑक्सिजनची गरज असताना त्यांचे सरकार कुठे होते? सरकारचे काम आम्ही केले. आता सरकार विचारते की हे का केले? काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढले. मात्र, मोदी सरकारने त्यांना पुन्हा गरिबीत ढकलले आहे. दिल्लीत पंतप्रधान नाही, राजा बसला आहे, अशी टीका करून गांधी म्हणाले की,देशात गरिबांचे सरकार हवे. रोजगार देणारे सरकार हवे. मोदी सरकारने हा देश दोन प्रकारात वाटला आहे. एक अब्जाधीशांचा देश आणि दुसरा बेरोजगारांचा देश!

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची उजळणी करताना गांधी म्हणाले की, आपण सत्तेवर आल्यास चार लाख तरुणांना रोजगार देण्याबरोबरच सिलिंडरची किंमत पाचशे रुपयांपेक्षा कमी ठेवू. पाच लाख कुटुंबांना वार्षिक ४० हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रत्येक गावात, घरोघरी आरोग्य सुविधा पोहोचवल्या जातील. उत्तराखंड उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपने केले आहे. उत्तराखंडला पुन्हा सुखी करण्यासाठी काँग्रेस काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा