घर Pimpri-Chinchwad भोसरी ते जुन्नर मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरु होणार : आमदार महेश लांडगे...

भोसरी ते जुन्नर मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरु होणार : आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश

337
0

पिंपरी l प्रतिनिधी

किल्ले शिवनेरीला अनेक शिवभक्त भेट देतात. मात्र सार्वजनिक वाहतूक सेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनांचा नागरिकांना आधार घ्यावा लागतो. शिवभक्त, विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड ते जुन्नर यांना जोडून ठेवण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे भोसरी ते जुन्नर या मार्गावर बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यावर पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून लवकरच या मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरु होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश आले आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले होते. त्यात म्हटले होते की, पुणे जिल्ह्यात स्वराज्याचे प्रतीक असलेले किल्ले शिवनेरीला भेट देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक मंचर, जुन्नर व आंबेगाव या भागात नोकरी, काम करतात. त्यानिमित्त त्यांची रोज या मार्गावर ये-जा सुरु असते. या मार्गावरून प्रवास करणा-यांमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

खाजगी वाहनातून प्रवास करणे हे महिला व विद्यार्थ्यांसाठी जोखमीचे आहे. तसेच खाजगी वाहनांची वेळ ठराविक नसल्याने कामानिमित्त जाणा-या नागरिकांची देखील मोठी गैरसोय होते. पीएमपीएमएल विभागामार्फत मंचर पर्यंत बससेवा उपलब्ध आहे. मंचर पासून जुन्नर पर्यंतचा पुढील प्रवास करताना इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

भोसरी येथून अनेक प्रवासी जुन्नरला जाण्यासाठी उपलब्ध असतात. जर या मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरु केली तर यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही. पीएमपीएमएलचे आर्थिक उत्पन्न वाढीस यामुळे मदत होईल. तसेच नागरिकांना किल्ले शिवनेरी पर्यंत थेट बससेवा उपलब्ध होईल. पीएमपीएमएल प्रशासनाने ही बससेवा सुरु करावी, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली होती.

यावर पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलकडून या मार्गावर लवकरच बससेवा सुरु होणार आहे. यामुळे विद्यार्थी, महिला, कामगार, शिवभक्त आणि नागरिकांसाठी ही सेवा सोयीची होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा