घर Crimes पोटच्या पोराला विकणारी आई साथीदारांसह गजाआड

पोटच्या पोराला विकणारी आई साथीदारांसह गजाआड

357
0

पुणे: स्वतःच्या पोटच्या चार वर्षांच्या मुलाला विकल्याच्या आरोपाखाली शहर पोलिसांनी एका महिलेसह इतर सात जणांना अटक केली आहे. हा गुन्हा केवळ पैशासाठी घडला आहे की या सर्वांचा मानवी तस्करीशी संबंधित टोळीत सहभाग आहे, याचा तपास सुरू केला आहे. नील पवार असे या मुलाचे नाव असून त्याला त्याचे वडील आणि कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

प्रियंका गणेश पवार (२४), जन्नत बशीर शेख (५५), रेश्मा सुतार (५३, सर्व रा. कोथरूड), तुकाराम निंबळे (६२, रा. मावळ), भानुदास माळी (४८) आणि त्यांची पत्नी चंद्रकला (४२ रा. पनवेल), दीपक म्हात्रे (४९) आणि त्यांची पत्नी सीताबाई (४१ रा. केळवणे, पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ४ फेब्रुवारी रोजी प्रियंका गणेश पवार हिने आपला मुलगा नील याचे अपहरण झाल्याचे सांगून कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेतली. आयपीसी कलम ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्याची नऊ शोध पथके या मुलाच्या तपासासाठी रवाना करण्यात आली, असे पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि कोथरूड परिसरातील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप आणि शंकर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी जन्नत शेख आणि मुलाची आई प्रियंका यांचा सहभाग असल्याची खात्री करून घेतली. त्यावरून केलेल्या चौकशीत असे दिसून आले की प्रियंका तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. या दांपत्याला चार वर्षांचा आणि एक वर्षाचा अशी दोन मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की, चौकशीअंती प्रियंका हिने दोन मुलांची जबाबदारी सांभाळू शकत नसल्याने तिचा मोठा मुलगा नील याला विकण्यासाठी जन्नत आणि रेश्मा सुतार यांच्यासोबत कट रचल्याचे आढळून आले.

त्यानुसार त्यांनी हा मुलगा भानुदास आणि चंद्रकला माळी या दाम्पत्याला मध्यस्थ निंबळे यांच्यामार्फत एक लाख रुपयांना विकला, अशी माहिती पोलिसांनी दिली. माळीने मुलगा दीपक आणि सीताबाई म्हात्रे यांना १ लाख ६० हजार रुपयांना विकला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मदतीने पोलिसांनी म्हात्रेंना गजाआड केले आणि त्यांच्या ताब्यातून मुलाची सुटका केली.

पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यामागे आणखी काही मोठा कट किंवा मानवी तस्करीचे रॅकेट आहे काय, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाची २४ तासांत उकल करण्यात आली असून मुलाची आई आणि तिच्या साथीदारांकडून आतापर्यंत ८१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मुलाला विकत घेतलेल्या आरोपींनीकबूल केले की त्यांना मूल होत नाही आणि म्हणून त्यांनी हे कृत्य केले. परंतु प्रत्येक आरोपीच्या भूमिकेची आणि तथ्यांची निश्चिती करण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपींना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा