घर Business आभासी चलनाचे वाढते मायाजाल

आभासी चलनाचे वाढते मायाजाल

383
0

नवी दिल्ली: क्रिप्टोकरन्सीमध्ये बनावट गुंतवणुकीद्वारे करण्यात आलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांनी विकसित देशांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात नुकत्याच अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाने या समस्येकडे जगाचे लक्ष वेधले आहे. फेडरल ट्रेड कमिशन या अमेरिकन शासकीय संस्थेने अशा तक्रारींची चौकशी करून आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.

जगभरात क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत असतानाच त्यामध्ये घोटाळे होण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. कोणत्याही सरकार किंवा राज्यकर्ते या प्रश्नाकडे डोळेझाक करू शकत नाहीत. क्रिप्टोकरन्सी नेमकी कशा पद्धतीने वापरली जात आहे, याबद्दल अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने समस्या अधिक जातील बनत आहे. समाजमाध्यमे आणि क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेंडमुळे घोटाळेबाजांचे काम सोपे झाले आहे, असे निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे आता अशा फसवणुकीबद्दल लोकांना जागृत करून त्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना करणे ही सरकारांची जबाबदारी आहे.

एफटीसीच्या अहवालानुसार अशा घोटाळ्यांचे सर्वाधिक बळी हे तरुण वर्गातील आहेत. साधारणपणे तरुण वर्ग तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सजग असतो. मात्र, त्यांना आर्थिक बाबींचे फारसे ज्ञान नसते. याच कारणामुळे १८ ते ३९ वयोगटातील नागरिक अशा घोटाळ्यांना बळी पडण्याची शक्यता दुप्पट असल्याचे आढळून आले आहे. क्रिप्टोकरन्सीबाबत फसवणुकीच्या एकूण प्रकारांपैकी तब्बल ३७ टक्के प्रकरणात समाजमाध्यमांचा वापर करण्यात आला आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे लोक पैशाची देवघेव करण्यासाठी अनेकदा क्रिप्टोकरन्सी वापरतात. मात्र, बहुतेक वेळी त्यांच्या हातात काहीच पडत नाही. अशा घोटाळ्यांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची भूमिका एफटीसीच्या अहवालात विशेष नमूद करण्यात आली आहे. उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये बाली पडलेल्या व्यक्तींपैकी तब्बल एक तृतीयांश लोक या दोन समाजमाध्यमातून भामट्यांच्या संपर्कात आले. या दोन प्लॅटफॉर्मवर ९० टक्के ऑनलाइन खरेदी घोटाळे होतात, असे अहवालात म्हटले आहे. सन २०१७ पासून अमेरिकेत नोंदविण्यात आलेल्या एकूण फसवणुकीच्या प्रकरणांपैकी जवळपास २५ टक्के प्रकरणे समाजमाध्यमाद्वारे फसवणुकीची आहेत. सन २०२१ मध्ये अमेरिकेत ९५ हजारांहून अधिक लोकांनी समाजमाध्यमातून फसवणुकीचा बळी ठरल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणांमध्ये, ७७ दशलक्ष डॉलरची फसवणूक झाली.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सन २०२१ मध्ये, क्रिप्टोकरन्सीच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली आहे. भारतातही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, क्रिप्टोकरन्सीमध्ये ‘मनी लाँड्रिंग’ची प्रकरणेही त्याच वेगाने वाढली आहेत. मागील वर्षी क्रिप्टो फसवणुकीची रक्कम ८. ६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. हे प्रमाण २०२० च्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढले आहे.

विशेष म्हणजे, भारतातही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आधीच्या अहवालानुसार, देशात कार्यरत असलेल्या विविध क्रिप्टो एक्सचेंजेसमध्ये सुमारे 15 दशलक्ष भारतीयांनी नोंदणी केली आहे.एका अहवालानुसार, देशात १० कोटी ५० लाख क्रिप्टो गुंतवणूकदार आहेत, ही संख्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सन २०३० पर्यंत ही संख्या लक्षणीय प्रमाणात वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. मात्र, भारतातही क्रिप्टोकरन्सीशी संबंधित फसवणुकीची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा