घर Pimpri-Chinchwad ज्येष्ठ रसिकांसाठी सरगमप्रेमींचा अनोखा उपक्रम..

ज्येष्ठ रसिकांसाठी सरगमप्रेमींचा अनोखा उपक्रम..

370
0

सरगमप्रेमी मित्र मंडळाचे सगळ्यात ज्येष्ठ सभासद श्री.विठ्ठलराव सुद्रिक यांनी दिनांक १७/६/२१ रोजी त्यांच्या वयाची ९९ वर्षे पूर्ण करुन १००व्या वर्षात पदार्पण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी त्यांचे समक्ष अभिष्टचिंतन करता आले नाही. सरगमप्रेमी मित्र मंडळाने त्यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घ्यावेत या सद्हेतूने त्यांचे कुटुंबीय आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, कोरोनाची नियमावली सांभाळीत नुकतीच एक गाण्यांची मैफिल त्यांच्या घरी आयोजीत केली होती. त्यामध्ये श्री.अंगद गायकवाड, अंजली गायकवाड, सौ.वर्षा पंडित ह्या कलाकारां सोबत त्यांच्या कुटुंबीयांनी विविध गाणी गाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यामध्ये त्यांच्या आवडीची नाट्यपदे, भजने आणि मराठी गाणी त्यांना ऐकवली. या वयात त्यांनी शेवटपर्यंत बसून मैफिलीचा आनंद तर घेतलाच, पण गाण्यातली त्यांची उत्तम समज, तल्लख स्मरणशक्ती, विनोदबुद्धी, उत्तम दृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन याची प्रचिती सगळ्यांनाच आली. आपल्या खणखणीत आवाजात त्यांनी काही आठवणी सांगून सर्वांचे आभार मानले.

श्री.विठ्ठलराव सुद्रिक यांचा अल्प परिचय..
“शतायुषी भव” असा आशिर्वाद देण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. पण तरीही आजच्या जीवनशैलीमुळे शंभरी गाठणारे कोणी दिसणे आणि ते आपल्याला भेटणे तसे दुर्मिळच. कष्टप्रद, प्रामाणिक, आदर्श आणि निर्व्यसनी आयुष्य जगलेल्या सुद्रिका साहेबांना नियमित व्यायाम आणि त्यांच्या आदर्श व्रत जीवनशैलीमुळे आज पर्यंत बी.पी. डायबेटिस चा‌ सुद्धा त्रास नाही. वयाच्या ९०व्या वर्षी ते हार्मोनियम शिकले, वयाच्या ९८ पर्यंत ते नियमितपणे पोहोत होते. २०१४ मध्ये पोहोण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रौढ गटात प्रथम येऊन त्यांनी गोल्ड मेडल मिळवले. हरीहरेश्वर प्रतिष्ठान ने ‘जल रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. आजही ते मूकबधिर शाळेचे मानद खजिनदार म्हणून काम पहातात. एक वर्षापूर्वी ते करोनावर मात करून सहा दिवसातच रुग्णालयातून घरी सुखरूप परतले.

सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या स्थापनेला ४४वर्षे पूर्ण होत आहेत, तेंव्हा पासूनच्या सदस्यांपैकी अनेक ज्येष्ठ सभासद सरगमच्या कार्यात सहभागी आहेत. परंतू गेल्या दोन‌‌ वर्षात कोणताही कार्यक्रम नसल्याने परस्पर भेटींचा योग नसल्याची अनेक ज्येष्ठांची खंत आहे. ज्येष्ठ रसिक तब्येती मुळे कार्यक्रमाला येऊ ही शकत नाहीत. निमित्त काढून त्यांना घरी जाऊन भेटावे, जमल्यास गाणं ऐकवावं, असा उपक्रम सरगम ने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

अशा उपक्रमातून ज्येष्ठ रसिकांना मिळणार आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, दोन्हीही अविस्मरणीय असते. म्हणूनच सर्व ज्येष्ठांसाठी हा उपक्रम यापुढेही सुरु राहील असे सरगमचे अध्यक्ष राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा