घर Pimpri-Chinchwad सुनेत्रा पवार यांचा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराने गौरव

सुनेत्रा पवार यांचा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराने गौरव

438
0

पिंपरी, 24 डिसेंबर – चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार सुनेत्रा अजित पवार यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल सुनेत्रा पवार यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच मोरया गोसावी पुरस्काराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांचा 460 वा संजीवन समाधी महोत्सव चिंचवड येथे सुरु आहे. संजीवन समाधी महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमासाठी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर प्रमुख उपस्थित होते. तसेच खासदार श्रीरंग बारणे, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, मंगला कदम, पोलीस अधीक्षक मिटेश भटके, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप आदी उपस्थित होते.

ऋग्वेदातील सर्वोच्च पदवी मिळाल्याबद्दल विनायक रबडे यांचा गौरव करण्यात आला. विजया भालचंद्र पुरस्कार अवधूत देशपांडे, प्रल्हाद जोशी यांना मिस इंडिया या सौंदर्यवती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल पूनम महाराणा यांचा सन्मान करण्यात आला. राजेंद्र शेलार यांनी गुणवंत कामगार पुरस्कार, तसेच धार्मिक आणि विवाह विषयक क्षेत्रातील कामाबद्दल कैलास शेलार, सामाजिक आणि पत्रकारिता जयराम सुपेकर, गणेश भक्त रुक्मिणी तारू, क्रीडा क्षेत्र आबासाहेब काळे, उद्योग क्षेत्र डॉ. सोपानराव पवार, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्र प्रमोद कुबडे, अॅड. शिवाजी वाळके, मातृसेवाभावी संस्था सुहास गोडसे, कायदेविषयक क्षेत्र अॅड. शिवाजी वाळके, प्रभावती पडवळ, दत्तात्रय देव, संजीव पाटील, हणमंत पाटील, हभप मोरेश्वर जोशी यांना मोरया गोसावी पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “हा गौरव माझ्या एकटीचा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. मोरया गोसावींच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे. हा पुरस्कार प्रथमच एका महिलेला मिळाला असल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात अडथळ्यांनी होते. मी सामाजिक कार्याची सुरुवात केली त्यावेळी अनेक अडचणी आल्या. शिस्त आणि स्वच्छता यांना महत्व देऊन काटेवाडी गावात ग्रामस्वच्छतेच काम केलं. पुढे या कामाची व्याप्ती वाढली आणि लोक जोडत गेले. यातून पुढे ग्रामस्वच्छता, जलसंधारण, पर्यावरण रक्षण, आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात काम झालं आहे.”

डॉ. एकनाथ खेडकर म्हणाले, “श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी प्रथमच एका महिलेला दिला, याबद्दल देवस्थानचे कौतुक आहे. कर्माला धार्मिकतेची जोड हवीच. देवस्थानने या निमित्ताने पुरस्कार मिळालेल्या लोकांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. चिंचवड देवस्थान धार्मिकसह सामाजिक क्षेत्रातही खूप चांगले काम करत आहे.”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “चांगलं काम करणाऱ्या लोकांचा चिंचवड देवस्थान संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सन्मान करत आहे. देवस्थानने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. आज सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून प्रथमच एका महिलेला जीवनगौरव पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.”

राजेंद्र उमाप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हभप आनंद तांबे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा