२७ ते २९ जानेवारी दरम्यान “कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा-२०२३” चे आयोजन : भाऊसाहेब भोईर
पिंपरी, पुणे ( दि. १४ जानेवारी २०२३) अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आयोजित श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुरस्कृत “कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा-२०२३” शुक्रवार दि.२७ ते रविवार दि. २९ जानेवारी २०२३ दरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणार आहेत.
स्पर्धेचे हे २४ वे वर्ष असून परिषदेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी सातत्याने महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक, मुंबई, पुणे, सांगली अशा सर्व भागांतून वाढत जाणारा प्रतिसाद हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्रातील कोणत्याही हौशी, महाविद्यालयीन, औद्योगिक वा कार्यालयीन संघास खुली आहे. स्पर्धेसाठी नियमावली व माहितीसह अर्ज किरण येवलेकर (८८३०१ ४६९५१) व राजेंद्र बंग (९८२२३ १३०६६) यांच्याशी संपर्क साधून व्हॉट्सअपवर मिळू शकतील. स्पर्धेसाठी प्रवेशमूल्य रु. १००० असून सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज , रविवार दि. ७ जानेवारी ते गुरुवार, दि. १९ जानेवारीपर्यंत रोज संध्याकाळी ६.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत जमा करावेत. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केलेले पहिले २४ संघ स्पर्धेत भाग घेऊ शकतील. परगावातील संघांना आपल्या (संहिते व्यतिरिक्त ) इतर कागदपत्रांच्या छायाप्रती व्हॉट्स ॲपवर पाठवाव्या लागतील. स्पर्धेची तालिका ठरविण्यासाठी रविवार,
दि. २२ जानेवारी २०२३ रोजी, संध्याकाळी ७.३० वाजता परिषदेच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहाखालील कार्यालयात लॉट काढले जातील. दर वर्षाप्रमाणे यंदाही जास्तीत जास्त संघांनी आपली निराशा टाळण्यासाठी लगेचच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.