
पोलीस, प्रशासन, शिक्षण विभाग आदी सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे – राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या 20 वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत 15 हून अधिक शाळांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली, यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्व विषद करण्यात आले. याशिवाय फलक लिखाण, सोशल मिडीयाद्वारे जनप्रबोधन करणे आदी गोष्टी करण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग, विविध शाळा-महाविद्यालये आदी 150 ठिकाणी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदने देण्यात आली. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा महा विद्यालयामध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी 15 हून अधिक ठिकाणी क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले. ही चळवळ समितीच्या वतीने पुणे जिल्हात अनेक ठिकाणी राबवण्यात आली. याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाळा कॉलेज मधील सर्व विदयार्थ्यांनी विषय शांतपणे ऐकून घेतला आणि भारतमातेचा जय घोष केला. तसेच मुख्यधापकांना आणि शिक्षकांना विषय आवडला, अशी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानेही राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करू, असे आश्वासन दिले.