हैदराबाद: वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम समाजाला घुसखोर ठरवत आहेत. मुस्लिम लोक अधिक मुले जन्माला घालतात, असा त्यांचा दावा आहे. मात्र, समाजात फूट पाडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाकडून केला जाणारा हा अपप्रचार आहे, असा आरोप एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
आम्ही मुसलमान असलो तरी भारतीय आहोत. आमचा धर्म वेगळा असला तरी भारत हाच आमचा देश आहे. एक वेळ अशी येईल की मुसलमान या देशात बहुसंख्य ठरतील, असा दावा संघ आणि भाजपकडून केला जातो. मात्र, तो अवाजवी आहे, असेही ओवेसी यांनी सांगितले.
कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लिम करतात
मुसलमान लोक अधिक अपत्य पैदा करतात, हा दावा संघ आणि भाजपकडून हिंदूंना घाबरवण्यासाठी केला जातो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. मुसलमानांचा प्रजनन दर घटत आहे. या देशात कंडोमचा सर्वाधिक वापर मुसलमानांकडून केला जातो. हा आपला दावा नाही तर एक सरकारी अहवालच ही वस्तुस्थिती मांडतो, असेही ओवेसी म्हणाले.
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या एका भाषणाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोप केला. काँग्रेस सत्तेवर आल्यास बहुसंख्य जनतेची संपत्ती ताब्यात घेऊन ती अधिक मुले जन्माला घालणाऱ्या आणि घुसखोरी करून आलेल्या समाजाला देण्यात येईल, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक सभेत केला जात आहे. या आरोपाचे ओवेसी यांनी खंडन केले.