मुंबई: प्रतिनिधी
स्वाभिमानी मराठा कुणबी होऊन आरक्षण घेणार नाही. मराठा आरक्षणाचा विषय नाजूक असून त्यावर सरकारने सखोल विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आर्थिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राणे यांचा विरोध आहे. याबद्दल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे राणे यांनी काल जाहीर केले होते. मात्र, ही पत्रकार परिषद रद्द करीत असल्याचा संदेश त्यांनी एक्स द्वारे दिला आहे. याच संदेशात त्यांनी राज्य सरकारला सल्लाही दिला आहे.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठा समाजाला लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास लाभला आहे. या समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजात समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. शिवाय तसे केल्याने इतर मागासवर्गीय समाजावर अतिक्रमण होणार आहे, असे मत राणे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात ३२ टक्के अर्थात ४ कोटी एवढी मराठा समाजाची संख्या आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश अधिक महत्त्वाचा आहे. आरक्षणाचा विषय हा नाजूक असून सरकारने त्याबाबत सखोल विचार करूनच निर्णय घ्यावा, असेही राणे यांनी नमूद केले आहे.