संजय राऊत यांची भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा टीका
मुंबई: प्रतिनिधी
भारताचा स्वातंत्र्यलढा तब्बल दीडशे वर्ष सुरू राहिला. या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात’ हे लोक कुठे दिसून आले नाहीत, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढविला.
भारत देशाने स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तब्बल दीडशे वर्ष कसून संघर्ष केला. मात्र, या संघर्षात हे लोक कुठेही दिसून आले नाहीत. मला आता त्यांची नावे घेण्याची इच्छा नाही, अशा शब्दात नाव न घेता राऊत यांनी भाजप आणि संघावरती टिकेचा पुनरुच्चार केला.
जिंकेल त्याला उमेदवारी
शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाचे सूत्र निश्चित झाले असून जिंकेल त्याला उमेदवारी, असे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जिंकेल त्याला उमेदवारी हे सूत्र मान्य केले असल्याचेही राऊत म्हणाले.
निवडून येण्याची क्षमता आणि चांगला उमेदवार, या दोन गोष्टी वरूनच महाविकास आघाडीमध्ये तिकिटांचे वाटप होणार आहे. आघाडीतील सर्व घटक पक्षांना तिकीट वाटपाचे सूत्र मान्य असल्यामुळे आघाडीत तिकीट वाटपावरून कोणतीही ओढाताण नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही तिकीट वाटपाचे हे सूत्र स्पष्ट करण्यात आले आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यामध्ये समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मान्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्याची इच्छा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांची सत्ता आली तर लोकशाहीचा ऱ्हास होईल आणि विरोधकांची कारागृहात रवानगी होईल, असा आंबेडकर यांचा दावा असून ती योग्यच आहे. प्रकाश आंबेडकर हे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांना घटनेचे महत्त्व निश्चितपणे माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.