श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मोहन जोशी यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षांपूर्वी पुण्यात स्मार्ट सिटी योजना समारंभपूर्वक मोठे मोठे जाहिराती देऊन जाहीर केली. पाठोपाठ २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत भाजपला सलग ५ वर्षांसाठी सत्ता मिळाली. एकहाती सत्ता मिळूनही या योजनेतंर्गत काहीही स्मार्ट काम पुण्यात झालेले नाही. कामांच्या निविदांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा मात्र केला गेला, असा आरोप करून या संपूर्ण योजनेची किमान पुणे शहरासाठीची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
याबाबत बोलताना मोहन जोशी म्हणाले, आधीच विकसित असलेल्या पुण्यातील बाणेर बालेवाडी या परिसराची कार्यक्षेत्र म्हणून निवड केली गेली. त्यासाठी पुणेकरांमध्ये सर्वेक्षण नावाचा प्रकार करून नंतर सर्वांच्याच तोंडाला पाने पुसण्यात आली. बाणेर बालेवाडीमध्ये तरी काय केले? ते जाहीरपणे पुणेकरांना सांगावे असे आव्हान मोहन जोशी यांनी केले.
आता केंद्र सरकारने ही योजना बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. ‘गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली‘ असा हा प्रकार आहे. यात पुणेकरांचे कोट्यवधी रुपये मात्र सल्लागार कंपन्यांच्या घशात गेले असे मोहन जोशी म्हणाले.
शपथ घेऊन खोटे बोलायचे, बोलायचे एक करायचे एक हा भाजपचा स्वभावच आहे. स्मार्ट सिटी योजना त्याचे उत्तम उदाहरण आहे. सत्तेवर येताच भाजपने शहरांमधील जनतेला त्यांची शहरे स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवले. त्याला ८ वर्षे झाली. या काळात पुणे महानगरपालिकेत भाजपचीच पूर्ण बहुमताची सत्ता होती. पुणे शहर या ८ वर्षात कोणत्या अर्थाने स्मार्ट झाले हे भाजपने पुणेकरांसाठी जाहीरपणे सांगावे किंवा मग हाही निवडणूका जिंकण्यासाठी केलेला जुमला होता याची जाहीर कबुली तरी पुणेकर जनतेला द्यावी असे ते म्हणाले.
काँग्रेसकडे स्मार्ट सिटी योजनेत पुणेकरांसाठी भाजपने कधीकधी, कायकाय घोषणा केल्या याची यादीच असल्याचे स्पष्ट करून मोहनजोशी म्हणाले, कोट्यवधी रूपयांचा निधी या काळात केंद्र सरकारकडून आलेल्या सल्लागार कंपन्यांवर खर्च केला गेला. केंद्रानेच पाठवलेल्या अधिकाऱ्यांना कोट्यवधीचे वेतन दिले गेले. महापालिकेचा अधिकार काढून घेतला गेला. त्या बदल्यात करदात्या पुणेकरांना काय मिळाले तर अर्धवट योजना, शहरातील अनेक रस्त्यांची अनाकलनीय मोडतोड आणि चौकाचौकात उभे केलेले जाहिरातींचे अशोभनीय विद्युत खांब! ज्याचा शहराला शुन्य ऊपयोग आहे असे मोहन जोशी म्हणाले.
विकासाची आश्वासने देत सत्तेवर येताच भारतीय जनता पक्षाने धर्म आणि जातीभेदाची नखे बाहेर काढली. त्यावेळी दिलेली वारेमाप वचने म्हणजे ‘निवडणूकीचा जूमला‘च असल्याचे ‘स्मार्ट सिटी‘ या फसव्या योजनेवरून सिद्ध होत असल्याची टीका मोहन जोशींनी केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वतंत्र कारभार करण्याच्या अधिकारालाच नख लावण्याचा डाव स्मार्ट सिटी योजनेत होता असेही ते म्हणाले.
पुणेकर जनता भाजपच्या या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दिलेल्या भूलथापांना आगामी निवडणूकीत मतपेटीतून योग्य ऊत्तर देईलच, काँग्रेस कायम पुणेकरांबरोबर असेल असे मोहन जोशी यांनी शेवटी सांगितले.