रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्राजक्ता वेदपाठक यांना प्रदान
पुणे : प्रतिनिधी
अभिव्यक्तिचा कस लागावा असा साहित्यातील मोठा प्रकार म्हणजे काव्य होय. जीवनातील बऱ्या-वाईट अनुभवांच्या ठिणग्या होतात आणि त्या ठिणग्यांच्या कविता बनतात. सोशल मीडियाच्या जगात मुक्त छंदातील कवितांना घसरण लागली असून आजची कविता छंदमुक्त झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ गझलकार, कवी रमण रणदिवे यांनी केली.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री, गझलकार, शायरा प्राजक्ता वेदपाठक यांना आज (दि. 29) रणदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पाटणकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्यासह अभिनेते, दिग्दर्शक आणि भाऊसाहेब पाटणकर यांचे नात जावई किरण यज्ञोपवित तसेच पत्रकार, कवी नितीन केळकर मंचावर होते. भाऊसाहेब पाटणकर यांचे नातू केदार पाटणकर यांचीही उपस्थिती होती. भगवत्गीता, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मुक्तछंदाचे संक्षिप्त रूप घेऊन लिहिणारे अनेक कवी आज दिसतात अशी टिप्पणी करून रणदिवे म्हणाले, मुक्त छंदातील कवितेची जी स्थिती आज झाली आहे तशीच स्थिती गझलेचीही झाली आहे. कविता हा आपल्या आयुष्याचा एक भाग असतो. आयुष्य अथांग, विराट असते. आयुष्याला भिडावे लागते. आयुष्याची मोजदात फुटपट्टी लावून कधी करता येत नाही. जीवनाच्या संपूर्ण प्रवासामध्ये सुख-दु:खांच्या उतरंडी असतात, पाप-पुण्याचे धागेदोरे असतात. आज विविध अपहरणांनी माणसाचे लचके तोडले जात आहेत. महानगरांचे रस्ते माणसांच्या रक्ताने भरले आहेत, अप्रगत भागातून गुदमरलेल्या श्वासांचे स्फोट ऐकू येत आहेत, सृजनांची अस्वस्थता दुर्लक्षित करता येत नाही. असे चित्र पाहून कलावंत अस्वस्थ होतो. आयुष्याच्या कल्पवृक्षाला शाश्वताची फळे ही कलेतूनच फुटतात.
नितीन केळकर म्हणाले, भाऊसाहेब यांच्या मनात अनेक वर्षांपासून दाटून राहिलेले विचार त्यांना भौतिक जग लौकिक अर्थाने अंधुक दिसू लागल्यानंतर काव्याच्या माध्यमातून बाहेर आले. त्यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष झाले हे वास्तव आहे. त्यांनी शिकार कथा लिहिल्या आहेत. शिकार कथा लिखाणाची शैली मात्र शिकार झालेल्या वाघाने लिहिल्या आहेत असे वाटावे अशी त्यांची लिखाणाची हातोटी होती. लोकांचे वाचन आज अल्पाक्षरी झालेले असल्याने कमीतकमी शब्दांत काव्य किंवा गझल लिहिली गेली तर या साहित्य प्रकाराला चांगले दिवस येतील, असेही त्यांनी सांगितले.
किरण यज्ञोपवित म्हणाले, भाऊसाहेब अत्यंस सुखासिन जीवन जगले. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन चिंतनात्मक होता. दृष्टी गेल्यानंतरही ते उर्वरित आयुष्य डोळसपणे जगले.
सत्काराला उत्तर देताना प्राजक्ता वेदपाठक म्हणाल्या, भाऊसाहेब पाटणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांचे आशीर्वादच आहेत. मी कवितेला काय दिले हे मला माहिती नाही पण मला कवितेने मला माझ्या मोठ्या दु:खातून सावरण्याची ताकद दिली. कविता हा आत्म्याशी संवाद असतो. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात माझी कविता बहरत गेली, समंजस होत गेली.
प्राजक्ता ही अंतर्मुख कवयित्री आहे. तंत्रानुगामी कवितांच्या काळात वृत्ताच्या आकर्षणापोटी ती कविता लिहित नाही. पुढील लेखन प्रवासात तिने सामाजिक विषयांवर सजगपणे भाष्य करावे, अशी अपेक्षा भूषण कटककर यांनी वेदपाठक यांच्या कवितेचे मनोविश्लेषण करताना केली.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करून ॲड. प्रमोद आडकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित कविसंमेलनात मीरा शिंदे, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, प्रज्ञा महाजन, मिलिंद शेंडे, निरुपमा महाजन, सुजाता पवार, वैजयंती आपटे, सुजित कदम, रुपाली अवचरे यांचा सहभाग होता. डॉ. ज्योती रहाळकर यांनी सूत्रसंचालन केले.