या आठवड्यात, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या मालिकेत अयोध्येचा राजकुमार भगवान श्रीराम (सुजय रेऊ) धैर्य, आत्मशोध आणि सदाचरणाच्या पथावर मार्गक्रमण करताना दिसेल. शिक्षण पूर्ण करून राज्यात परत आलेल्या रामाची आणि पिता राजा दशरथाची (आरव चौधरी) हृदयस्पर्शी भेट प्रेक्षक अनुभवतील. परंतु ही भेट क्षणभंगुर असणार आहे, कारण राम आणि त्याचा निष्ठावान भाऊ लक्ष्मण (बसंत भट्ट) या दोघांना ऋषी विश्वामित्र ताडका (त्राटिका) नामक राक्षसीचे निर्दालन करण्यासाठी आपल्यासोबत घेऊन जातात. श्रीरामाचे इतर दोघे भाऊ भरत (निखलेश राठोड) आणि शत्रुघ्न (सामर्थ्य गुप्ता) पुढील शिक्षण सुरू ठेवतात.
सीआयडी मध्ये उपनिरीक्षक पूर्वीची भूमिका करणारी अभिनेत्री अंशा सैयद या मालिकेत त्राटिकेच्या भूमिकेत दिसणार आहे, जी एक अत्यंत सामर्थ्यशाली आणि भयावह राक्षसी होती. त्राटिकेशी युद्ध करताना श्रीरामाच्या धनुर्विद्येचे कौशल्य तर पणाला लागलेच पण एका स्त्रीशी युद्ध करू नये, या त्याच्या मनात रुजलेल्या मूल्याचा देखील फेरविचार करण्याची वेळ आली. सदर कथानकाविषयी सविस्तर बोलताना सुजय रेऊ म्हणाला, “कधी कधी शस्त्रास्त्रांनी लढलेल्या युद्धांपेक्षा आपल्या मनातील अंतर्गत संघर्ष अधिक कठीण असतो. त्यात तुमच्या मूल्य-निष्ठेचा कस लागतो. आपले प्रत्येक पाऊल, आपली प्रत्येक निवड आपण कोणता मार्ग धरतो ते ठरवत असतात. कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्या द्वंद्वात सापडलेल्या रामाला पाहताना मी हे शिकलो की, खरे सामर्थ्य फक्त शौर्यात नसून ज्या करुणेने आत्मियतेने आपण कृती करतो, त्यातही असते. आणि नियती एक गुंतागुंतीचे जाळे आपल्याभोवती विणत असताना अनपेक्षित संघर्षाला आपल्याला सामोरे जावे लागते, ज्यावेळी आपल्या उद्देश्यांची खोली आपल्याला दिसून येते.”
विश्वामित्र ऋषी या दोन्ही भावांना आपल्या सोबत घेऊन जातात, त्याच प्रवासात अहिल्या उद्धाराची कथा देखील येते. करुणा, सद्गुण आणि कायापालट घडवणारा अनुभव यांची गुंफण असलेली ही कथा आहे. पुढे हे दोघे भाऊ मिथीला नगरीत पोहोचतात. येथे सीतेचे (प्राची बन्सल) भव्य स्वयंवर योजलेले असते. श्रीरामाचे धैर्य आणि करुणा यांच्या गोष्टी ऐकून प्रभावित झालेली सीता श्रीरामाच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करत असते. प्रत्यक्ष भेटीपूर्वीच तिचे मन काबिज करणाऱ्या राजपुत्राचे दर्शन घेण्यासाठी ती आसुसलेली आहे.
अशा प्रकारे या दिव्य कथेतील शौर्य, आत्मनिरीक्षण, प्रेमाचे आकर्षण अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.