सोलापूर: प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. चौकशीचा संभाव्य ससेमिरा टाळून आपण जमवलेली माया सुरक्षित ठेवण्यासाठी शिंदे भाजपा मध्ये जाणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिंदे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या ही चौकशी थांबविण्यात आली आहे. हे चौकशीचे शुक्लकाष्ट टाळण्यासाठी आणि आपण जमवलेली माया सुरक्षित ठेवण्यासाठी शिंदे भाजपा मध्ये जाणार आहेत. संविधान बदलले जाईल वगैरे गोष्टींशी शिंदे यांना काही देणे घेणे नाही. आपली माया सुरक्षित ठेवणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, अशा आरोपही आंबेडकर यांनी केला.
मोदी सरकारचा कार्यकाळ काळाकुट्ट
मोदी सरकारचा 10 वर्षांचा कार्यकाळ काळाकुट्ट आहे. व्यसनी माणूस आपल्या वडिलधाऱ्यांनी मिळवलेली संपत्ती उधळून टाकतो. तशा व्यसनी माणसाच्या आणि पंतप्रधान मोदी यांच्या मन:स्थितीत काहीही फरक नाही, अशी कठोर टीका आंबेडकर यांनी मोदी यांच्यावर केली.
“वंचित’चे खाते उघडणार
मागील निवांणुकीपेक्षा यावेळी मतदार वंचित बहुजन आघाडीला अधिक प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत निश्चितपणे पक्षाचे खाते उघडणार आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
परदेशस्थ भारतीयांना मोदी सरकारच्या धमक्या
मागील काही काळात तब्बल 17 लाख हिंदूंनी भारताचे नागरिकत्व नाकारून परदेशात जाऊन राहणे पसंत केले आहे. अशा देश सोडून गेलेल्या भारतीयांना मोदी सरकार धमक्या देत आहे, असा आरोप करून आंबेडकर यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.