पुणे: प्रतिनिधी
दांडेकर पूल परिसरातील ४८ व्या वर्षात पदार्पण करणारे आझाद मित्र मंडळ ट्रस्ट परिसरातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच अनेक सामाजिक कार्य पार पाडत आहे.
गणेशोत्सव नवरात्र उत्सव यासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच स्थानिक समस्या आणि सामाजिक कार्याबाबतही मंडळ सजग आहे.
मंडळाची स्थापना 1976 या वर्षात झाली असून मंडळाचे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्याचे हे 48 वे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात मंडळ अग्रेसर आहे.
कोरोनाचे संकट आणि कालवा फुटल्यामुळे पर्वती परिसरात उद्भवलेली पूरस्थिती अशा आव्हानात्मक काळात मंडळाने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याचबरोबर दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप, हुशार व गरजू विद्यार्थिनींना दत्तक घेणे, वृक्षारोपण, गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा अनेक प्रकारचे कार्य मंडळाच्या वतीने पार पाडले जाते.
सध्या अक्षय राऊत मंडळाचे अध्यक्ष असून राहुल भिगवणकर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना उपाध्यक्ष पुंडलिक लोंढे, खजिनदार लक्ष्मण शिंदे, हिशोब तपासणी सचिन मोरे यांच्यासह स्थानिक आबालबुद्धांचे सहकार्य लाभत आहे.