मुंबई: प्रतिनिधी
घरच्या सुनेला बाहेरची म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सीतामाई बद्दल कळवळा व्यक्त करणे म्हणजे निव्वळ ढोंग आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
अयोध्येच्या मंदिरात सीतामाईची मूर्ती नसल्याबद्दल शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा बावनकुळे यांनी समाचार घेतला. पवार यांनी यासंबंधी टीका करण्यापूर्वी मंदिराची पूर्ण माहिती घेणे आवश्यक होते. श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्ला अर्थात बाळ रूपातील रामाची मूर्ती स्थापित आहे. त्यामुळे तिथे सीतामाईंची मूर्ती असण्याचा प्रश्नच येत नाही, असे बावनकुळे म्हणाले.
एरवी आपण नास्तिक असल्याचा टेंभा मिरवत मंदिराबाबत नाके मुरडणाऱ्या पवार यांना सीतामाईचा कळवळा येणे हा डोंगराचा कळस आहे. केवळ एकाने निवडणुकीसाठी घरातल्या सुनेला बाहेरची म्हणणारे पवार कोणत्या तोंडाने सीतामाई बद्दल कळवळा व्यक्त करतात, असा सवालही त्यांनी केला.