साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ चे काम देखील वेगाने सुरु आहे. संमेलनासाठी तीन भव्य सभागृह उभारण्यात येत आहेत.
पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात भव्य अशी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यात येत आहे. साहित्य संमेलनासाठी तीन सभागृह उभारण्यात येत असून सभामंडप क्र.१ ला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठ नाव देण्यात आले आहे तर सभामंडप क्र.२ ला कविवर्य ना.धो.महानोर सभागृह व सभामंडप क्र.३ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नामकरण करण्यात आले आहे.
प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात तीन सभागृहांची उभारणी, व्यासपीठ, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, पार्किंग व्यवस्था आदी कामे जोमाने सुरु असल्याची माहिती मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली. साहित्य संमेलनासाठी देशभरातून येणाऱ्या मंडळीची निवास व्यवस्था ज्या-ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, त्याचीही स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आले असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले.
संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलन समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत, यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील काही तयारी करण्यात आली असल्याचे डॉ.जोशी यांनी नमूद केले.
प्रशासनाचा सक्रिय सहभाग
साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, प्रमुख संरक्षक व सल्लागार तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांनी सार्वजनिक बांधकाम, तहसील, पोलीस, विद्युत वितरण, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.