Home Pune ‘सावरकर विचार पुढे नेणे हे आपले कर्तव्य’ – गीता उपासनी

‘सावरकर विचार पुढे नेणे हे आपले कर्तव्य’ – गीता उपासनी

0
‘सावरकर विचार पुढे नेणे हे आपले कर्तव्य’ – गीता उपासनी<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान व्याख्यानमालेचा तिसरा दिवस

दि. ३ फेब्रुवारी – स्वा नंद जनकल्याण प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचा तिसरा दिवस आज युवा सावरकर अभ्यासक श्रीमती गीता उपासनी यांच्या ‘गुणसागर सावरकर’ या व्याख्यानाने संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर स्वानंदचे विश्वस्त श्री सुरेश महल्ले आणि या व्याख्यानासाठी प्रमुख अतिथी म्हणून आनंदक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती गोखले हे मान्यवर होते.

परिपाठाप्रमाणे प्रथम स्वानंदची प्रार्थना गायिली गेली. कु. तन्वी केळकर यांनी ही प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात श्री सुरेश महल्ले यांनी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान मार्फत चालविल्या जाणाऱ्या स्मार्ट अभ्यासिका आणि नैपुण्यवर्ग या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती सर्व श्रोत्यांना दिली. सौ आरती गोखले यांनी ‘व्याख्यानमाला’ हे विचारांचं बेट तयार करण्यासाठीचं महत्त्वाचं सूत्र असल्याचे प्रतिपादन करत आनंदक्षण शाळेचा पहिला मेळा ‘स्वा. सावरकर’ याच विषयावर झाल्याचे आवर्जून सांगितले. व्याख्यानमालेच्या या तिसऱ्या पुष्पामध्ये स्वानंद मार्फत गणेश कॉलनी या वस्तीत चालविल्या जाणाऱ्या समृद्धी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले.

आपल्या प्रमुख व्याख्यानामध्ये गीता उपासनी यांनी आपल्या प्रभावी शैलीतून स्वा. सावरकर यांच्या लोकोत्तर जीवनाचे अनेक पैलू श्रोत्यांपुढे मांडले. आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभी उपासनी यांनी महर्षी व्यासरचित भागवत पुराणातील वेदस्तुतीचे पठण केले. ‘मंत्रचळ टाकून यंत्रबळाचा वापर करावा’ हा सावरकराचा आग्रह असताना ही वेदस्तुती गाण्यामागचे कारणही त्यांनी पुढे स्पष्ट केले. ‘स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असली पाहिजे असा स्वत: सावरकरांचाच आग्रह होता. जी संस्कृत भाषा संस्कृतीची वाहक आहे, त्या संस्कृत भाषेचा, साहित्याचा सावरकरांनी कायमच अभिमान बाळगला. त्यांचा विरोध अनावश्यक कर्मकांडांना होता. ज्या गायीला हिंदू गौमाता म्हणून पूजनीय मानतो, त्या गायींच्या कळपांना समोर ठेवून हिंदूंना युद्धापासून परावृत्त करण्याचे प्रकारही मुसलमान आक्रमकांनी या भूमीवर केले आहेत. हा संदर्भ घेऊन सावरकरांनी भविष्यातील गोवंश वाचवता यावा याकरिता अशा घटनांमध्ये काही गायी बळी देऊनसुद्धा जिहाद्यांचा खातमा हिंदूंनी करायला हवा होता, अशी मांडणी केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी हिंदू संघटन ही सावरकरांची कळकळ होती. सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अनेक पैलू असलेल्या लखलखीत हिऱ्याप्रमाणे होते. क्रांतिकार्य, समाजसुधारणा, साहित्य, काव्य, भाषाशुद्धी, इतिहास संशोधन, विज्ञाननिष्ठा अशा सर्व क्षेत्रांमध्ये सावरकरांनी नुसतेच कार्य केले असे नव्हे तर त्यांचा या सर्व क्षेत्रांमध्ये एक अधिकार होता. पण असे असतानाही सावरकरांनी हे सांगून ठेवले आहे की जोवर भारत संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकाचे बलाढ्य राष्ट्र म्हणून उदयाला येणार नाही, तोपर्यंत माझी ही सर्व कामे बाजुला ठेवून फक्त हिंदूसंघटन हेच काम लक्षात ठेवा आणि त्या दिशेनेच काम करा. म्हणूनच त्यांच्याच आज्ञेनुसार त्यांचे प्रखर हिंदुत्व पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे’ अशी मांडणी गीता उपासनी यांनी केली. त्यासाठी त्यांनी पुढील दाखले दिले –

‘प्राचीन संस्कृत कवींच्या कमी शब्दांत नेमका आशय सांगणाऱ्या गुणाचे सावरकरांना फार कौतुक होते. स्वत: तात्यारावदेखील या गुणाने युक्त होतेच. ‘मस्तक शास्त्रकाराचे, हृदय महाकवीचे आणि वाणी बृहस्पतीची – असे तीन दुर्मिळ गुण एकट्या सावरकरांच्या व्यक्तिमत्वात आहेत. मात्र घुबडाला ज्याप्रमाणे दिवसाचा सूर्यप्रकाश दिसत नाही त्याप्रमाणेच काही मानवी घुबडे या सावरकरसूर्याला नाकारण्याचा हीन प्रयत्न सातत्याने करीत असतात. कारण सावरकर-विचारांतील प्रखरता या लोकांना सहनच होऊ शकत नाही. ज्या समुद्राला पवित्र सिंधु नदी जाऊन मिळते त्या समुद्राला अरबी समुद्र म्हणण्याचे कारण नाही, तर त्यास सिंधुसागर म्हणायला हवे, असा अभिमान सावरकरांकडे होता. अशी प्रखर राष्ट्राभिमानी माणसे जेव्हा राष्ट्रांत असतात तेव्हा ती राष्ट्रे इस्राएल, जपानप्रमाणे प्रगतिपथावर जातात.’

‘हिंदुत्वाला परिभाषित करण्याचे काम हे शास्त्रकार म्हणून सावरकरांचे मोठे योगदान आहे. वीर सावरकरांनी हिंदुत्वाचं शास्त्र निर्माण केलं. ते हिंदुत्वाचे सिस्टिम बिल्डर होते. नवे शास्त्र रचण्यासाठी सकस वाचन आणि सातत्यपूर्ण चिंतन महत्वाचे असते. या पायरीवर सावरकर शिशु असतानाच पोहोचले होते. ज्या वयात गोष्टींची पुस्तके वाचायला हवीत, त्या वयात सावरकर आरण्यके वाचत असत. घरात आरण्यके वाचली तर घराचे अरण्य होईल ही त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती पुढे खरी ठरली असे स्वत: सावरकरच नंतर म्हणत असत. पण ‘हे जीवन क्षणभंगुर आहे’ ही बाब या आरण्यक वाचनातूनच त्यांच्या मनावर ठसली. वडिलांकडून ऐकलेले सप्तशतीचे पाठ त्यांच्या बाळमनावर कोरले गेले होते. त्यातूनच भक्तीची तीव्र भावना मनात स्थिर झाली होती. हिंदुत्व हे असे रुजत गेलेले होते.’

‘या सततच्या चिंतनाने त्यांच्यातले वक्तृत्व फुलत गेले. लहान वयातही मोठमोठ्यांनी तोंडात बोटे घालावीत अशी वाणी त्यांनी स्वत:च्या अभ्यासातून अर्जित केली होती. चापेकर बंधुंसारखे क्रांतिकारक तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांनी आदर्श मानले होते. त्यांच्या बलिदानामुळे आलेल्या अस्वस्थतेतून घेतलेली देशसेवेची शपथ त्यांनी अखेरपर्यंत निभावली. त्यांची विज्ञाननिष्ठा, बुद्धीप्रामाण्य हे जितके महत्वाचे आहे तितकीच हिंदू जीवनमूल्यांवरील डोळस श्रद्धा हीदेखील ठसठशीतपणे जाणवणारी आहे. धर्मभोळेपण हे समाजधारणेला घातक आहे हे तर खरेच, पण तसेच बुद्धीभोळेपणही तितकेच घातक आहे असेही सावरकर स्पष्टपणे मांडतात. दुष्ट रूढींवर प्रहार करणारे सावरकर आग्रहपूर्वक मांडले जातात, पण भोगलेल्या कठोर वेदना आणि केलेल्या अपरिमित त्याग यांच्या मागे अधिष्ठित असलेली आध्यात्मिक शक्ती मात्र दुर्लक्षित केली जाते. एखाद्या दिव्य उद्दिष्टासाठी आपले जीवन समर्पित करणे ही त्यांची जीवनश्रद्धा होती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्ती हे ईश्वरी कार्य म्हणून त्यांनी व्रताप्रमाणे अंगिकारले. ‘ज्याच्या देहाचे फूल मातृभूमीसाठी वाहिले जाईल, तेच सार्थक जीवन’ या आशयाचे पत्र त्यांनी आपल्या वहिनींना लिहिले होते. अंदमानचा कारावास भोगण्यामागे विचारांची ही स्पष्टता आणि आध्यात्मिक शक्ती होती.’

‘इतकी भीषण दु:खे भोगूनही त्यांची ‘प्रतिभा’ मात्र सदैव प्रफुल्लित राहिली, ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशेषता आहे. त्यापूर्वी बोटीवर झालेल्या छळावरची प्रतिक्रिया म्हणून ‘अनादि मी अनंत मी’ हे काव्य प्रकटले. त्यामागेही प्रेरणा होती भगवद्गीतची. दोन जन्मठेपींची शिक्षा झाल्यानंतरही न्यायमूर्तींना ‘आपण हिंदूंचा पुनर्जन्म सिद्धांत मान्य करीत आहात’ असे मिश्किलपणे सावरकर म्हणतात ते त्यांच्या ठायी असलेल्या स्थिरबुद्धिमुळेच. अंदमान कारागृहात पोहोचल्यावर शिक्षेचा विचार करण्याऐवजी बेटाचा अंडाकृती आकार बघून अंदमान या नावाच्या व्युत्पत्तीचा विचार करणारा हा स्थितप्रज्ञ होता. योगासुत्रांवर महिनोन् महिने चिंतन करणाऱ्या या आधुनिक ऋषीस आपण नास्तिक ठरवून त्यांच्यावर मोठाच अन्याय केला आहे.’

‘अंदमानच्या कोठडीतही त्यांनी महाकाव्य निर्मिती केली, उर्दू, अरबीसारख्या भाषांवर प्रभुत्व मिळवले, बळाने बाटविलेल्या लोकांची घरवापसी करून घेतली. घरवापसी हा विषय त्यांच्यासाठी हिंदू संघटनेइतकाच महत्वाचा होता. एखादा चोर असेल तरी त्याने हिंदू धर्म सोडणे हे हिंदू धर्मासाठी वाईटच आहे ही त्यांची मांडणी होती. हिंदू श्रद्धेचेही योग्य आकलन त्यांच्याकडे होते आणि मूर्तीभंजक इस्लामचे स्वरूपही त्यांनी यथार्थपणे ओळखले होते. हिंदुस्तानची फाळणी हा त्यांच्याकरिता सर्वात क्लेशकारक विषय होता आणि या गोष्टीचा सल अखेरपर्यंत त्यांच्या मनात राहिला. देह थकला तेव्हा एखाद्या ऋषीप्रमाणे प्रायोपवेशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. त्यांच्या अंत्ययात्रेला कॉँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही तेव्हा उपहासाने आचार्य अत्रे यांनी ‘सावरकरांची पवित्र अंत्ययात्रा विटाळली गेली नाही’ असं लिहिलं होतं. ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायापेक्षा, स्वकीयांनी केलेले अपमान तात्यारावांनी अधिक सहन केले. ज्या राष्ट्रात अशा देशभक्तांची अवहेलना होते ते राष्ट्र रसातळाला जाते. म्हणूनच आजवर सावरकरांची झालेली उपेक्षा भरून काढणे हे आपले कर्तव्य आहे.’

या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवव्रत वाघ यांनी तर आभार प्रदर्शन कु. गार्गी बाळापूरकर यांनी केले. प्राजक्ता जहागिरदार यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने या व्याख्यानाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here