
सचिन गवळी आणि निलेश मुणगेकर यांचा उपक्रम
पुणे: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रंथ, पुस्तक यामधून शिवराय लोकांपर्यंत पोहोचतात मात्र आजची तरुणाई फारसे वाचत नाही. यामुळे युवा पिढीला जवळचे वाटते अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार त्यांच्या पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ५१ लघुपटांच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना देणार असल्याची माहिती अभिनेते, दिग्दर्शक सचिन गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला निर्माते नीलेश मुणगेकर, अभिनेत्री स्मृती सचिन गवळी, विवेक यादव, सागर ठाकूर, श्रुती साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते. या लघुपटांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन सचिन गवळी यांचेच असून याची निर्मिती शिवगर्जना क्रिएशन आणि एन एम इंटरप्राइजेस च्या सहकार्याने करणार आहे.
पुढे बोलताना सचिन गवळी म्हणाले, आजच्या युवा पिढीच्या मनात विचारांचे द्वंद्व बघायला मिळते. शिक्षण, नोकरी यातील स्पर्धा, सभोवतालचे बिघडलेले सामाजिक वातावरण यामुळे तरुणाईचा संयम ढासळत असल्याचे दिसून येते. परिणामी तरुणाईमध्ये व्यसनाधीनता, आत्महत्या, महिलांबद्दल अनादर अशा घटना सातत्याने घडतान दिसत आहे. याच तरुणांच्या सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांसाह अनेक महापुरुषांचे फोटो दिसतात मात्र या महापुरुषांचे विचार त्यांच्या डोक्यात किंवा विचारात दिसत नाहीत. यामुळे या पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहचवण्यासाठी आम्ही लघुपटांचा मार्ग निवडला आहे. यातील पहिला लघुपट ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सर्व लघुपट युट्यूब, तसेच फेसबुकसह अन्य सोशल मिडियावर बघायला मिळणार आहेत.