- बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन महोत्सवाचा उत्साहात समारोप
- मान्यवरांच्या उपस्थितीत ५५ किलोचा कापला केक
पुणे : प्रतिनिधी
एका व्यक्तीचा नव्हे तर वास्तूचा, सांस्कृतिक वास्तूचा वाढदिवस साजरा केला जातो ही या भूमीतील पहिलीच पद्धत असावी, या बद्दल मेघराज राजेभोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. असाच योग दरवर्षी जुळून यावा हीच अपेक्षा करतो, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी बालगंधर्व परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले.
बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर ५५ वा वर्धापनदिन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विश्वास पाटील बोलत होते. यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सूर्यादत्ता शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उद्योजक आणि नाट्य निर्माते मारुती चव्हाण, गौरी मारुती चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
राजेश पांडे म्हणाले, बालगंधर्व परिवाराच्या माध्यमातून मेघराज राजेभोसले आणि त्यांचे सहकारी एक ऐतिहासिक उपक्रम राबता आहेत, त्यांचे अभिनंदन करतो.
बालगंधर्व रंगमंदिर ५५ वा वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकारणाने रंगलेल्या या महोत्सवाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत तब्बल ५५ किलो चा केक कापून करण्यात आला.
दरम्यान, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सांगता मास्टर जयसिंग पाचेगांवकर सह लता-लंका पाचेगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाच्या सादरीकरणाने झाली.
त्याचबरोबर बालगंधर्व परिवाराची आनंदवारी-गंधर्वदारी या कार्यक्रमात कलाकारांच्या १० वी आणि १२ उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
बालनाटिका जिर्णोद्धार, प्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या विषयावर व्याख्यान, महाराष्ट्रात गाजत असलेल्या लोकगीतांचा कार्यक्रम ‘आवाज महाराष्ट्राचा’ लोकप्रिय गायिका राधा खुडे आणि सहभागी कलाकार त्यानंतर पारंपारिक जागरण गोंधळ सादरकर्ते महागायक चंदन कांबळे, शाहीर विलास अटक, मीरा दळवी, प्रदिप कांबळे ‘द रील स्टार शो’, त्याचबरोबर प्रा. अशोक देशमुख यांचा ‘हसत खेळत तणावमुक्त जीवन’ हा कार्यक्रम आणि विशेष साधक बाधक चर्चा ‘इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?’ आधी कार्यक्रम यावेळी सादर झाले.
दिग्गज लेखक विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, निर्माते शशिकांत पवार, दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज काझी यांनी केले. याचबरोबर रात्री डेस्टिनी द बॅण्ड संदीप पाटील प्रस्तूत हिटस् ऑफ कुमार शानू संगीत रजनी संपन्न झाली. डॉ. संजय चोरडिया यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले आणि बालगंधर्व वर्धापन दिन सोहळा उपक्रमाचे कौतुक केले.
बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित या महोत्सवाला कलकारांसह पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.