स्वच्छ पाणी, सांडपाणी तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा प्रदर्शन
पुणे: प्रतिनिधी
आपल्या परिसरातील नद्या, नाले, तलाव स्वच्छ रहावेत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर केल्यास भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. गाड्या धुवायला, शौचालयात फ्लशिंगसाठी, शेतीसाठी तसेच परसबागेसाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर हा आंघोळ, स्वयंपाकघर, धुणी-भांडी यांमधून निर्माण होणार्या सांडपाण्यातून होऊ शकेल. यामुळे नैसर्गिक स्वच्छ पाण्याचा वापर कमी होऊन पाण्याचा अपव्यय टळेल आणि तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणेवरचा भार देखील कमी होईल. त्यासाठी सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.
यावेळी आयोजक सादिक शेख, एस शंकर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे नुकतेच “इंडिया वॉटर शो अँड रीन्यूएबल एनर्जी एक्स्पो” या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी धारिया बोलत होते. यावेळी आयोजक सादिक शेख, एस शंकर, मास्माचे अध्यक्ष शशिकांत वाकडे व माजी अध्यक्ष रोहन उपासनी, संजय कुलकर्णी उपस्थित होते. या प्रदर्शनात प्रामुख्याने पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रणाली आणि तंत्रज्ञान, ओझोन निर्मिती प्रणाली, चाचणी उपकरणे, आरओ प्लांट्स, अल्कधर्मी पाणी, फिल्टर्स, बाष्पीभवन प्रणाली, रूफ टॉप सोलर, सौर पॅनेल, सौर उर्जेवर चालणारी विविध उपकरणे पाहायला मिळाली.
आयोजक सादिक शेख म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील उद्योगांद्वारे दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी तसेच प्रक्रिया न केलेले दूषित पाणी नदीत जाणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. अनेक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया न करता स्थानिक जलसाठ्यांमध्ये सोडले जाते, ज्यामुळे पाण्याचे साठे दूषित होतात. तसेच लोकांचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी मैलापाण्याचे योग्य पद्धतीने निस्सारण होणे गरजेचे आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी मुख्य प्रवाहात आल्यामुळे आणि पावसाच्या स्वच्छ पाण्यात मिसळल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे घर अथवा सोसायटीतून येणार्या सांडपाण्याचा पुनर्वापर त्या परिसराच्या आवारात झाला पाहिजे. त्यामुळे सांडपाणी क्षेत्रातील तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
संजय कुलकर्णी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. ग्रीन हायड्रोजन आता भविष्यातील ऊर्जेच्या गरजेसाठी शाश्वत इंधन पर्याय आहे. भारत हायड्रोजन उत्पादनाच्या संपूर्ण मूल्य शृंखलेत उत्पादन करण्यासाठी मेक इन इंडिया धोरणाला प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण सुरू केले आहे. हायड्रोजनचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यामध्ये रसायने (केमिकल), लोह, पोलाद, वाहतूक, हीटिंग आणि वीज यांचा समावेश आहे. हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषणही पसरत नाही. हायड्रोजनवर चालणारी फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल शून्य कार्बन उत्सर्जनासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हे वाहन पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे ज्यामध्ये पाण्याशिवाय इतर कोणत्याही पदार्थाचे उत्सर्जन होत नाही. ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो.