अहमदनगर: प्रतिनिधी
शेतीतील उत्पादनांना योग्य भाव मिळाला, शेतकरी सुखा समाधानाने जगू शकला तरच भारत कृषीप्रधान देश म्हणून शोभून दिसेल, असे प्रतिपादन करतानाच ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.
शेतकरी हा या देशातील महत्त्वाचा घटक आहे. निवडणुका जवळ आल्या की सर्व पक्षांचे नेते आणि उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात. मात्र, तेच नेते एकदा निवडून आले की शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. ही बाब अयोग्य असून राजकीय नेता, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना, त्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे, असे मत अण्णांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही काळापूर्वी अण्णा हजारे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. अण्णांमुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही, अशा अर्थाचे ट्विट त्यांनी अण्णा हजारे यांना उद्देशून केले होते. याबाबत अण्णांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी आव्हाड यांना अब्रूनुकसानीची नोटीस बजावली होती. या नोटिशीला आव्हाड यांच्याकडून उत्तर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ॲड. पवार यांनी दिली आहे.