
सरकारने दिलेला २४ डिसेंबरच्या कालमर्यादेचा शब्द पाळण्याचे मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
जालना: प्रतिनिधी
कायद्यानुसार मुलांना आईची नव्हे तर वडिलांची जात लावली जाते. आईची जात मुलांना लावणे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही, असे स्पष्टीकरण देत आई इतर मागासवर्गीय असेल तर मुलांना आरक्षण देण्याची मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारने नकार दिला आहे तर मराठा आरक्षणाबाबत सरकारला आत्तापर्यंत दिलेला शब्द आंदोलकांनी पाळला असून यापुढे सरकारने त्यांचा शब्द पाळावा, अन्यथा आपली भूमिका २३ डिसेंबर रोजी स्पष्ट करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, अशी घोषणा हिवाळी अधिवेशनात केली आहे. त्यामुळे यापूर्वी दिलेल्या २४ डिसेंबरच्या कालमर्यादेनंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलने केली जाऊ नयेत, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन केले. मात्र, मराठा आरक्षणासाठी यापुढे मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे सूचित करत जरांगे पाटील यांनी आपली पुढील भूमिका २३ डिसेंबर रोजी स्पष्ट करू, असे सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत समाजाने सरकारच्या शब्दाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. सरकारच्या सांगण्यानुसार प्रथम ४० दिवस, नंतर २ महिने मुदत मान्य केली आहे. मराठा समाजाने आतापर्यंत दिलेला शब्द पाळला आहे. आता सरकारने त्यांचा शब्द पाळावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.