पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २० वर्षांपासून समाविष्ट गावांना विकासापासून झुलत ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंगतीला नगरसेवक वसंत बोराटे बसले, ही बाब समाविष्ट गावांसाठी दुर्दैवी आहे, अशी टीका माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव यांनी केली आहे.
भाजपाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेले वसंत बोराटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, प्रवक्ते तथा पिंपरी-चिंचवड प्रभारी योगेश बहल उपस्थित होते.
माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर गावे समाविष्ट होवून २० वर्षे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विकासकामांच्या बाबतीत आणि महत्त्वाच्या पदासाठी समाविष्ट गावांवर अन्याय केला. आमदार महेश लांडगे यांनी जाती-पातीचे राजकारण न करता समाविष्ट गावांतील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना नगरसेवक केले. नगरसेवक असलेल्यांना महत्त्वाची पदे दिली. समाविष्ट गावांमध्ये विकासकामे मार्गी लावली. मात्र, वसंत बोराटे यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राष्ट्रवादीच्या पंगतीत बसून, समाविष्ट गावांचा स्वाभिमान दुखावला आहे.
*
वसंत बोराटे यांनी आत्मचिंतन करावे : निखील बोऱ्हाडे
गेल्या पाच वर्षांत विकासकामे झाली नाही, ही बाब सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असलेल्या वसंत बोराटे यांना निवडणुकीच्या तोंडावर आठवली, याचे आश्चर्य वाटते. प्रभागातील विकासकामांसाठी बोराटे यांनी काय पाठपुरावा केला? हा खरा प्रश्न आहे. रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी स्थानिक नागरिकांना सोबत घेवून भूसंपादनाचा विषय मार्गी लावला असता, तर रस्ते का अपूर्ण राहिले असते? ग्रीन झोनबाबत नगरसेवकपदाच्या काळात बोराटे यांनी कुणाकडे पाठपुरावा केला? निवडणुकीच्या तोंडावर आपल्या अपयशाचे खापर बोराटे भाजपावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधारी पक्षात असताना विकासकामे करता आली नाही, याचे आत्मचिंतन नगरसेवक वसंत बोराटे यांनी करावे, अशी प्रतिक्रिया निखील बोऱ्हाडे यांनी दिली.
*
मोशीकर आमदार लांडगे यांच्या पाठिशी : निलेश बोराटे
महापालिका सभागृहातील अल्प अनुभवामध्ये मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवल्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ नगरसेवक वसंत बोराटे यांच्यावर आली. मोशीसह समाविष्ट गावात केलेल्या विकासाच्या जोरावर स्वाभिमानी मोशीकर निश्चितपणे आमदार लांडगे यांच्या पाठीशी राहतील. लांडगे यांनीच खऱ्या अर्थाने मोशीकरांचा स्वाभिमान जपला आहे. यापूर्वी आमच्या लोकांना नेत्यांच्या घरी तिकीटासाठी पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. लांडगे यांनी नवख्या उमेदवारांना घरात आणून एबी फॉर्म दिले. आपल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक केले. आता पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी वेगळा मार्ग स्वीकारणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आमदार लांडगे यांचे समर्थक निलेश बोराटे यांनी दिली.