
मुंबई: प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा असून आंदोलनासाठी राजधानी मुंबईत येणारे मनोज जरांगे पाटील आणि अन्य आंदोलकांचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांनी सांगितले.
आजमी यांनी जरांगे यांना पाठिंबा देणारे पत्र पाठविले आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजवादी पक्ष दीर्घकाळ आंदोलन करीत आहे. न्यायालयाने आदेश देऊनही मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण अद्याप दिलेले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना आपण समजू शकतो. आपल्या मागणीला पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
यापूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या गोळीबार आणि लाठी हल्ला प्रकरणी शासन, प्रशासनाचा निषेध करून समाजवादी पक्षाने मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. या पुढील काळातही मराठा समाजाला पक्षाचा पाठिंबा असेल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण स्वतः इच्छा असूनही जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही. मात्र, पक्षाचे प्रवक्ते व महासचिव रेवण भोसले, महासचिव अनिस अहमद व अब्दुल रौफ यांचे शिष्टमंडळ आपली भेट घेणार आहे, असेही आजमी यांनी पत्रात म्हटले आहे.