नवी दिल्ली: प्रतिनिधी
लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून स्मोक बॉम्ब घेऊन सभागृहात आलेले युवक आणि संसदेच्या सुरक्षेबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या खासदारांचे निलंबन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीश धनखड यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही परिस्थिती सुधारण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती ही त्यांनी उपराष्ट्रपतींना केली आहे.
दोन युवकांनी १३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षेचा भंग करून सभागृहात घुसखोरी केली. सन २००१ मध्ये ज्या दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला त्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे तिचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत भर पडली आहे.
अशी घटना घडल्यानंतर संसद सदस्यांनी संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करणे अत्यंत स्वाभाविक आहे. सरकारनेही याबाबतीत आपले धोरण स्पष्ट करणे आवश्यक होते. मात्र, तसे करण्याऐवजी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याचा प्रकार जबाबदारी आणि निष्पक्षतेच्या दृष्टीने अत्यंत विसंगत आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.
सुरक्षेच्या प्रश्नावरून सभागृहात झालेल्या गोंधळात सहभागी नसलेल्या खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी आणि संसदेची कार्यपद्धती व लोकशाही मूल्य अबाधित राखण्यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती पवार यांनी आपल्या पत्रात केली आहे