नवी दिल्ली: प्रतिनिधी
इंडिया आघाडीत कोणतीही महत्त्वाची जबाबदारी न मिळाल्याबद्दल नाराज असलेल्या नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार यांच्याही नाराजीने ते अधिक गडद झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून सहमती न झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच करून त्या थांबलेल्या नाहीत तर आपल्या पक्षाचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. पंजाबमध्येही आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असून त्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संमती आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले आहे.
तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या घटक पक्षांनी काँग्रेसशी फटकून राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर नितीश कुमार यांनीही काँग्रेस पासून अंतर ठेवून राहण्याचे धोरण अवलंबल्यामुळे इंडिया आघाडीच्या भवितव्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.