संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अरविंद देशमुख
अमरावती: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित पहिले संत गाडगे महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन दि २३ जुलै रोजी अमरावती येथे होत आहे. संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डॉ अरविंद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान यांच्या उपस्थितीत व राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत संमेलनाच्या आयोजनासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ देशमुख यांनी संत गुलाबराव महाराज यांच्या विचारावरील प्रबंधावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारा आचार्य पदवी मिळाली आहे. ते विद्यापीठस्तरीय अभ्यास मंडळे, विविध समित्यावर कार्यरत आहेत तसेच डॉ अरविंद देशमुख हे उत्कृष्ठ वक्ता असून अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. यापूर्वी अनेक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद त्यांनी भूषिवले आहे,
ग्रंथदिंडी, उदघाटन सत्र, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात असणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने यापूर्वी १५७ विविध साहित्य संमेलने देशभरात आयोजित केली आहेत.
या संमेलनाला मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साहित्य परिषदेचे अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर पाटील यांनी दिली. साहित्यप्रेमींनीही या साहित्यसोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.