पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशासाठी खुद्द उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काय म्हणाले संजोग वाघेरे?
संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळेच आपण या विषाणूला रोखू शकलो. तेव्हाच मी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीने प्रभावित झालो होतो. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिशा देण्याचं काम करत असतात”, असं संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.
“या मंडळींनी (सत्ताधारी) आता संविधानाच्या बाबतीत चुकीची भूमिका घेतली आहे. अनेक वेगळे मुद्दे काढले आहेत. या सगळ्याचा विचार आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. उद्धव ठाकरे हो म्हणतील का? याविषयी शंका वाटत होती. पण इथे त्यांना भेटलो, तेव्हा अत्यंत मितभाषी असं व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळालं. आता ते देतील ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत”, असं संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मला या काळात भावूक आणि घाऊक याच्यातील फरक कळायला लागला आहे. कोण घाऊक आहेत ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून जिंकत आलेलो आहोत. गजानन बाबर खासदार होते. गेल्यावेळी ज्यांना शब्द दिल्यानं उमेदवारी दिली त्यांनी गद्दारी केली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो.
इकडे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही आला आहात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मावळला प्रचाराला येण्याची गरज नाही, हे तुमच्या उत्साहावरुन दिसतंय. पण, मी प्रचाराला नक्की येणार आहे, असं ठाकरे म्हणाले. मावळ मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवाणर,असं उद्धव ठाकरे म्हणाले.