- नवी दिल्ली: प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या दिवशी २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा निर्णय केंद्रीय कार्यालय व आस्थापना, शाळा महाविद्यालय आदींना लागू असणार आहे. प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर होणारे थेट प्रक्षेपण पहाता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.
श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, हा कार्यक्रम पाहणे प्रत्यक्ष शक्य नसले तरी दूरचित्रवाणीवर त्याचा अनुभव घेता यावा यासाठी देशभरातून मागणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे या दिवशी नागरिकांनी दिवाळीसारखा सण साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या दिवशी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या मूळ स्थानी उपस्थित रहावे. आपल्या स्वतःच्या व आजूबाजूच्या लोकांच्या घरात दीपोत्सव साजरा करावा, गरिबांना अन्नदान करावे, नागरिकांना प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करावी, हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपल्या परिसरातील नागरिकांना रेल्वेद्वारे आयोध्येत दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करावी, मंत्र्यांनी स्वतःही यांच्याबरोबरच रेल्वेतून प्रवास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.