पुणे : प्रतिनिधी
डॉ. कुमार विश्वास यांची अमोघ वाणी… काव्यमय श्रीरामकथेचे निरूपण… हजारो श्रोत्यांची उपस्थिती… हात उंचावत केलेला रामनामाचा जयघोष… अशा भावभक्तीमय वातावरणात ‘अपने अपने राम’ रामकथा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ‘चलो अब लौट चले रघुराई’, ‘अच्युतम केशवम राम नारायणम’ अशा भजनांनी परिसर राममय झाला.
येत्या सोमवारी (दि. २२) अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान होत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय रामकथा विशेष कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली.
टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेश पांडे, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप चैतन्य महाराज कबीर, प्रदीप गारटकर, विजय अप्पा रेणूसे, विजय जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. कुमार विश्वास म्हणाले, “श्रीराम नावातच एक आत्मिक उर्जा आहे. रामकथा भारतीय संस्कृती, कौटुंबिक मूल्यांची शिकवण देते. वचनपूर्ती, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा काय असतो, याचा आदर्श प्रभू श्रीराम आहेत. श्रीराम कोणत्या जाती-धर्माचे नाहीत. ते दलित, वनवासी, वंचित अशा सर्वांचे आहेत. रामकथा प्रेरणादायी असून, युवापिढीला ती समजावून सांगण्याची गरज आहे. तारुण्य, संपत्ती, ताकद व विवेक या चार गोष्टीचा मिलाप रामाकडे होता. त्यामुळे जिथे राम, तिथे अयोध्यानगरी, जिथे राम तिथे चैतन्य आणि तिथेच रामराज्य असते. राम सर्वांचा आहे. आपण ज्या दृष्टीतून पाहतो, तसा तो दिसतो. राम चराचरात आहे. प्रत्येकात आहे. त्याला समजून घेत प्रत्येकाने रामाचे गुण आचरणात आणावेत.”
“पाचशे वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरता होती. कित्येक पिढ्यांना वाट पाहावी लागली. तो पावन आणि आनंददायी क्षण प्रत्यक्षात येत असून, त्या क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. आठ हजार वर्षांपासून रामकथा आपण वाचत, ऐकत व पाहत आहोत. मात्र, प्रत्येकवेळी ही रामकथा आपल्याला जगण्याला ऊर्जा देत मन तृप्त करते. रामाच्या अस्तित्वावर आधीही संशय घेतला जात असे, आजही घेतला जातो. पण रामावर टीका करणाऱ्यांना प्रतिकार करू नका. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने राम जगा, अंगीकार करा. प्रत्येकवेळी तो आपल्याला प्रेरणा देत राहील.”
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकणे, ही पुणेकरांसाठी पर्वणी आहे. एसपी कॉलेजच्या मैदानावर शुक्रवार (दि. १९) व शनिवार (दि. २०) या दोन्ही दिवशी डॉ. विश्वास रामकथेचा पुढील भाग सादर करणार आहेत. अयोध्येतील राममंदिराची नयनरम्य प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, ७० ते ८० हजार लोकांची बैठकव्यवस्था आहे. सर्वांना विनामूल्य प्रवेश असून, पार्किंग व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या रामकथेचा आस्वाद घ्यावा.”