पुणे: प्रतिनिधी
‘शौर्य दिनी भीमा कोरेगाव येथे टँकरने गर्दीत होणारी गैरसोय टाळून शासनाने पॅक बंद पाण्याची सोय करावी’, असे आवाहन संविधान ग्रुपचे सचिन गजरमल, राकेश सोनवणे, राजे प्रतिष्ठानचे मिलिंद गायकवाड, लष्कर-ए-भीमा संघटनेचे सचिन धीवार आणि सहकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एक जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांसाठी शासनाने पाण्याच्या टँकर च्या ऐवजी पॅकबंद बॉटलमध्ये पाणी वाटण्याची व स्तंभाजवळ बॅरिकेट काढून सर्वसामान्य नागरिकांना स्तंभापर्यंत पोहोचून अभिवादन करता येईल अशी व्यवस्था करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘गेल्या दोन-तीन वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे मागणी करीत आहोत की, भीमा कोरेगाव एक जानेवारी शौर्यस्तंभाला येणाऱ्या अनुयायांसाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा करू नये. गर्दीत गैरसोय होते. तिथे पॅकबंद बॉटलने पाणीपुरवठा करण्यात यावा. यामध्ये शासनाचा धरसोड कारभार दिसून येतो. सर्व अधिकाऱ्यांसाठी तिथे पाण्याच्या बाटलीची व्यवस्था केली जाते पण सर्वसामान्य भीम अनुयायांसाठी टॅंकरने पाणी दिले जाते. हा दुजा भाव आहे. टँकरने सर्वाना पाणी कोणीच देऊ शकत नाही. ते पाणी वाया जाते आणि सर्वसामान्य भीम अनुयायांना पाणी मिळत नाही. गर्दी असल्यामुळे टँकर आत येऊ शकत नाही. लोक पाण्यासाठी इकडे तिकडे भटकतात. त्यामुळे शासन भीमा कोरेगाव येथे कोट्यावधी रुपये खर्च करत असून उपयोग होत नाही. यामुळे आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी करतो की, आपण जर एक जानेवारी रोजी पाण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देवू आणि आमचे म्हणणे मांडू, याची नोंद प्रशासनाने घ्यावी व याची सर्व सुविधा द्याव्यात. ही सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील’,असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शौर्य दिन हा शासन दरबारी एकच दिवस नोंद असून, दोन दिवस साजरा करण्याबाबत कोणी अफवा पसरवू नये, असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.