
मुंबई: प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी शीना बोरा हत्याकांडाने देशभर खळबळ उडविली होती. त्यावर ‘एक थी शीना बोरा’ हे पुस्तक लिहून पूर्ण होण्यापूर्वीच त्या पुस्तकावर आधारित वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा झाली आहे. मुंबईत आयोजित ‘किताब मेला’ या कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक संजय सिंह यांनी ही माहिती दिली.
शीना बोरा हत्याकांडानं २०१५ साली देशभरात खळबळ उडवली. पोलिसांच्या मते इंद्राणी मुखर्जीनं आपला पहिला पती सिध्दार्थ दासपासून झालेली मुलगी शीना बोराचा खून आपला दुसरा नवरा संजीव खन्ना आणि चालकाच्या मदतीनं केला. इंद्रायणीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जीचा मुलगा राहुलसोबत शीनाचं प्रेम प्रकरण सुरू होतं. राहुल पीटरच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा होता. यामुळं या दोघांचं लग्न होवू नये, असं इंद्रायणीला वाटत होतं. इंद्रायणीचा दुसरा नवरा संजीव खन्नापासून झालेल्या मुलीला तिसरा नवरा पीटरनं दत्तक घेतलं होतं.
लेखक संजय सिंह यांच्या मते, “या प्रकरणात आजी-आजोबांना आपल्या नातवांचे आई-वडिल बनून राहायला लागले. सख्ख्या आईला आपल्या मुलीची मोठी बहिण असल्याचे भासवावे लागले आणि एका आयपीएस अधिकाऱ्याच्या यशस्वी कारकिर्दीला डाग लागला. या हायप्रोफाइल प्रकरणात सर्व काही होतं. सर्वात महत्त्वाचं नातेसंबंधांचा जंजाल व त्याने तयार झालेलं जबरदस्त कन्फ्युजन. मी या प्रकरणावर काम केले होते. त्यामुळे या क्लिष्ट गोष्टीला साध्या सोप्या पध्दतीने सांगत, घटनांना एका रांगेत ठेवून त्या समजून सांगणे गरजेचे आहे.”
राजकमल पब्लिशिंग हाऊसला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटर येथे किताब मेला आयोजित करण्यात आला. यात लेखक आणि कवि गुलजार, जावेद अख्तर, पियुश मिश्रा आणि सौरभ शुक्ला सारख्या हिंदीतल्या दिग्गजांनी हजेरी लावली. संजय सिंह यांनी सांगितलेे की, एका मोठया प्रोडक्शन हाऊसने या पुस्तकावर वेब सिरीज बनवण्याचे हक्क विकत घेतले आहेत.
संजय सिंह हे मुंबईतील ज्येष्ठ शोध पत्रकार आहेत. अब्जावधी रुपयांचा तेलगी स्टॅम्प घोटाळा उघड करण्याचे श्रेय यांच्या नावावर आहे. पहिले पुस्तक तेलगी स्कॅम एक रिपोर्टर की डायरी वर अप्लॉज मीडिया ही अग्रगण्य प्रॉडक्शन कंपनी स्कैम २००३ ही वेबसीरीज बनवत आहे. येत्या काही महिन्यात सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचं प्रदर्शन होणार आहे. शिवाय संजय सिंह यांनी पत्रकार राकेश त्रिवेदींसोबत लिहिलेल्या ‘CIU: क्रिमिनल इन युनिफॉर्म’ या पुस्तकावर ही वेबसीरीजची घोषणा नुकतिच करण्यात आली आहे.