संसदेमध्ये अधिक प्रश्न विचारल्याबद्दल शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून चार खासदारांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
संसदेच्या दरवर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकसभेतील चार खासदारांना संस्थेकडून २००९ पासून ‘संसदरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. खासदार, न्यायाधीश यांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत ही निवड केली जाते. त्यानुसार मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार बारणे यांना लोकसभेत लोकहिताचे आणि चांगले प्रश्न उपस्थित केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबरच ‘उत्कृष्ट महिला खासदार’ म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना, चर्चेतील सहभागाबद्दल राजस्थानचे खासदार पी. पी. चौधरी आणि झारखंडचे निशिकांत दुबे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्काराचे वितरण ११ जुलैला संस्थेच्या चेन्नई येथील सभागृहात होणार आहे.