पिंपरी, 26 मार्च – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरीनिमित्त जाहीर झालेल्या ‘संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने’ आज (शनिवारी) दिल्लीत गौरविण्यात आले. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलकुमार चंद्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार खासदार बारणे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माझा नसून मावळ लोकसभा मतदारसंघातील लोकांचा आहे. मी हा पुरस्कार जनतेला अर्पण करतो, असे खासदार बारणे म्हणाले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, माजी मंत्री विराप्पा मोहिली, हंसराज अहिर, प्राईम पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवास, अध्यक्षा प्रियादर्शनी राहूल ,एन.के.प्रेमचंद्रन आदी उपस्थित होते.
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीनिमित्त चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. लोकसभेत महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मागील सलग सात वर्षांपासून गौरविण्यात येत आहे. पाच वर्षे ‘संसदरत्न’, एकदा महासंसदरत्न आणि सातव्यावर्षी ‘संसद विशिष्ट रत्न पुरस्कार’ देऊन खासदार बारणे यांना गौरविण्यात आले. खासदार बारणे यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. सर्वसामान्य लोकांशी मिळून मिसळून वागणारे, लोकांना सहज उपलब्ध होणारे खासदार अशी त्यांची ओळख आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. मुंबईपर्यंत मतदारसंघ असतानाही खासदार बारणे यांनी लोकांशी सपर्क कमी होऊ दिला नाही. या संपर्काच्या जोरावरच त्यांनी पवार घराण्यातील उमेदवाराचा पराभव करुन इतिहास रचला आहे. लोकसभेतील उत्कृष्ट कामकाजाबाबत त्यांनी सलग सातवेळा पुरस्कार मिळाला. अतिशय शांत, संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
हा माझा बहुमान नसून मतदारसंघातील जनतेचा बहूमान – श्रीरंग बारणे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”संसदेतील उत्कृष्ट कामगिरीनिमित्त सलगपाचवर्ष संसदरत्न, एकदा महासंसदरत्न पुरस्काराने आणि यंदा ‘संसद विशिष्ट रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा माझा बहुमान नसून मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेचा बहूमान आहे. हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेला अर्पण करतो. संसदेतील विशिष्ट कामाबाबत हा पुरस्कार देण्यात आला. गेली अनेक वर्षे राजकारणात राहून समाजाची सेवा करत आहे. महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात झाली. ते देशाच्या लोकसभेपर्यंत मी पोहोचलो. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळेच मी देशाच्या लोकसभेत जाऊ शकलो. मावळातील जनतेसाठी चांगले काम करु शकलो. देशातील 543 खासदारांमध्ये कामकाजाच्या सहभागात माझा दुसरा क्रमांक आहे. केवळ संसदेत नाही. तर, मतदारसंघात विविध योजना आणल्या आहेत. यापुढेही लोकांसाठी अविरत काम करणार आहे”.