सध्याचे स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर हे तीन वर्षांपूर्वी शासनाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेत आले तेव्हा त्यांना शहर अभियंता पदी नियुक्ती मिळणे आवश्यक असताना शहरातील राजकीय लोकांच्या हट्टापायी राजन पाटील यांना शहर अभियंता पदी बसविण्यात आले. व अशोक भालकर यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या सह शहर अभियंता पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र आता शहर अभियंता राजन पाटील हे सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांच्या जागी अशोक भालकर यांची नियुक्ती करावी व त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा. अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सह शहर अभियंता मकरंद निकम व सह शहर अभियंता श्रीकांत सवणे तसेच रामदास तांबे हे शहर अभियंता पदासाठी पात्र आहेत पण मकरंद निकम यांच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली तसेच वाकड येथील सद्गुरू कॉलनी २/३ येथील डीपी. रस्ता बंद करून त्याजागी अनधिकृत बांधकाम करण्यात आले. तेथील स्थानिक नागरिक गेली पाच वर्षे तक्रार करुनही ते बांधकाम अजूनही काढण्यात आले नाही
श्रीकांत सवणे कार्यकारी अभियंता असताना नाशिक फाटा येथील भारत रत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावरील रॅम्प चुकल्यामुळे गेली नऊ वर्षे बंद स्थितीत आहे त्या रॅम्पवर सुमारे दहा कोटी रुपये खर्च झाला आहे. तसेच रामदास तांबे यांच्या काळात जमीन ताब्यात नसताना पवना बंद पाईप लाईन ची निविदा काढण्यात आली या चुकीच्या निर्णयामुळे महापालिकेचे सुमारे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
महापालिकेतील एखाद्या सह शहर अभियंत्यास शहर अभियंता म्हणून बढती देण्यापेक्षा शासनाकडून आलेले अभियंता अशोक भालकर यांना शहर अभियंता पदी बढती देण्यात यावी व त्यांच्यावर स्थानिक राजकीय नेत्यांनी केलेला अन्याय दूर करावा असे रमेश वाघेरे यांनी पत्रात नमूद केले आहे.