– वाहतूक पोलीस, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन
– विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काटेकोर अंमलबजावनी करण्याची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात खासगी शाळा- महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या स्कूल बसचे ‘फायर ऑडीट’ करावे. बसला आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने आणि पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एसटी, खासगी बस आणि काल शिवनेरी बसला आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात पुण्यातील स्कूल बसला आग लागल्याची घटना घडली होती. दिवाळीच्या सुट्टया संपवून आता शहरातील शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. दिवसेंदिवस बस आणि खासगी गाड्यांना आगीच्या घटनांची संख्या वाढत असल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, बहुतांश शाळांमध्ये खासगी ठेकेदारांकडून स्कूलबस सेवा पुरवली जाते. बसच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासन सतर्क असले तरी, आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस सेवा पुरवठादारांची माहिती संग्रहित करुन सर्व गाड्यांचे ‘फायर ऑडीट’ करण्याबाबत कार्यवाही करावी. प्रत्येक मोठ्या बसमध्ये किमान २५ ते ३० विद्यार्थी प्रवास करतात. लहान स्कूल व्हॅनमध्ये आठ ते १० विद्यार्थी प्रवास करतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासन आणि वाहतूक विभागाने सर्तकता बाळगली पाहिजे, अशी आमची मागणी दीपक मोढवे- पाटील यांनी केली आहे.
****
अनधिकृत स्कूल व्हॅनला पायबंद घाला…
स्कूल बस वाहतूक नियमावली धोरणानुसार सर्व बसेसची यांत्रिक व इतर स्थिती उत्तम असावी. शालेय बस नियम व विनियम २०१० अंतर्गत विहीत प्राधिकरणाने स्थिती प्रमाणित केलेली असणे बंधनकारक केले आहे. या बसेस पिवळ्या रंगाच्या असतील, तसेच बसेसच्या पुढे व मागे ‘शालेय बस’ असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे. स्कूलबसेस नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या नसाव्यात. मुंबईत ही मर्यादा ८ वर्षे आहे. तर सीएनजी बससाठी ही मर्यादा १५ वर्षे आहे. प्रत्येक बसमध्ये सुरक्षा दांडे, हाताने धरावयाचे कठडे, संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग, प्रथमोचार संच, अग्निशमन यंत्र गरजेचे आहे. विशेष म्हणजे, अनधिकृतपणे स्कूल व्हॅन चालवल्या जात आहे. त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी मागणीही दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.