मुंबई प्रतिनिधी
बराच काळ चर्चेत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी शशिकांत शिंदे यांना देण्यात आली आहे. शिंदे हे सध्या विधान परिषद सदस्य आहेत. शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे शिंदे यांचा सातारा जिल्हा विशेष कोरेगाव तालुक्यात चांगला प्रभाव आहे.
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच या निवडणुकीतही उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. मात्र, पाटील यांनी प्रकृती अस्वास त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर होता.
मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही या मतदारसंघासाठी चर्चेत होते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्यामुळे त्यांनी आदेश दिला तर आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनीही स्पष्ट केले होते.
या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरीही छत्रपती उदयनराजे भोसले हेच भाजपचे उमेदवार असतील, असे निश्चित मानले जात आहे. त्यांच्याशी शशिकांत शिंदे कशी लढत देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.