शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार झाले शक्य
पुणे: प्रतिनिधी
शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार करणारे,अशा स्वरूपाचे पहिलेच ‘सायबर नाईफ’ लेझर मशिन रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह च्या वतीने शनिवारी (दि. २९ जुलै २०२३) आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले.
या वेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ.सायरस पुनावाला, बजाज उद्योग समूहाचे संजीव बजाज, शेफाली बजाज, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार अली दारूवाला, रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेज ग्रँट आणि रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .बेहराम खोदाईजी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘रूबी हॉल क्लिनिकमध्ये कर्करोगात क्रांतिकारक उपचार करणाऱ्या नवीन लेझर प्रणालीमुळे पुणे उपचारांचे मोठे केंद्र होईल. ग्रामीण भागापासून मुंबईच्या रुग्णांना यांचा फायदा होईल,’ असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.
डॉ.परवेज ग्रँट म्हणाले,‘सायबर नाईफ’ लेझर मशिन कर्करोग रुग्णावर २० मिनिटांच्या कालावधीत वेदनारहित उपचार करेल. रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह कडून १६ वर्षांखालील कर्करोगग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील. साधारण रोज २०० कर्करोग रुग्णांवर या लेझर मशिनद्वारे उपचार करता येतील. या मशिनमुळे पुण्यातील वैद्यकीय पर्यटन वाढेल.’
अली दारूवाला, डॉ. परवेझ ग्रॅंट यांचा सत्कार
मुस्लीम समाजातून अली दारूवाला, तर पारशी समाजातून डॉ. परवेझ ग्रॅंट यांची भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली. त्याबद्दल या कार्यक्रमात डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.आयोगाच्या कामकाजात भरीव योगदान देऊ,असे अली दारूवाला,डॉ. परवेझ ग्रॅंट यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डॉ. कराड म्हणाले, ‘नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा सुरु झाल्या. २०१४ पर्यंत वैद्यकीय शाखेत विद्यार्थ्यांच्या ५१ हजार ३४८ जागा होत्या. आता एक लाख ७ हजार ९४८ झाल्या. वैद्यकीय महाविद्यालये ३८७ होती. २०१४ पासून त्यांची संख्या वाढली. आता ती ७०४ झाली. त्यात ८२ टाक्यांची वाढ झाली. पदवीव्युत्तर पदवीच्या जागा ३१ हजार १८५ होत्या. त्या ६७ हजार ८०२ झाल्या. याशिवाय मेडिकल इक्विपमेंटसाठी ‘पीएलआय स्कीम’ ‘स्टार्ट अप,’ ‘स्टॅंडप इंडिया’ या योजनांच्या मदतीने पंतप्रधान मेडिकल इक्विपमेंट बनवणाऱ्या उद्योगांना सुद्धा आत्मनिर्भर करत आहेत. पन्नास कोटी जनतेला आयुष्यमान भारत इन्शुरन्स दिल्यामुळे याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ‘नॅशनल रूरल हेल्थ मिशन’ आणि शहरी भागासाठी ‘नॅशनल रूरल अर्बन मिशन’द्वारे आरोग्य सेवा वाढविल्या आहेत.’
‘स्वातंत्र्यानंतर भारतात आरोग्य सुविधा रखडल्या होत्या. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीत यामध्ये क्रांतिकारक बदल झाला आहे. भारतात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० पटीने वाढ झाली आहे,’ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.