राष्ट्रनिर्माणासाठी समर्पण भावनेने कर्तव्य करावे – डॉ. रविंद्र नारायण सिंह
पिंपरी, पुणे (दि.१४ सप्टेंबर २०२३) – राष्ट्रनिर्माणासाठी प्रत्येकाने समर्पण भावनेने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करावे. प्रथम आपले कुटुंब सुसंस्कृत आणि सक्षम करावे. नंतर आपला शेजारी आणि समाज सुधारण्यासाठी पुढे यावे यातूनच सक्षम राष्ट्र निर्माण होईल असे मार्गदर्शन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रविंद्र नारायण सिंह यांनी केले.
बुधवारी भोसरी येथील वात्सल्य रुग्णालयास डॉ. सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी वात्सल्य सभागृहात आयोजित केलेल्या स्वागत समारंभात डॉ. सिंह बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, वात्सल्य रुग्णालयाचे संचालक डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. संदीप कवडे, डॉ. शंकर गोरे, डॉ. अर्चना गोरे तसेच डॉ. मेघनाथ पडसलगीकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. हेमंत क्षीरसागर, डॉ. दीपक शिंदे, डॉ. रमेश केदार, डॉ. अभिजीत काकडे, डॉ. विजय सातव, डॉ. सुयोग कुमार तारळकर, डॉ.संतोष घाडगे, डॉ. स्वाती म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील डॉक्टर, वकील, शिक्षक आणि उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांशी डॉ. रवींद्र सिंह यांनी संवाद साधला. डॉ. सिंह म्हणाले की, आपली संस्कृती आणि निसर्गाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करणे म्हणजेच धर्म कर्तव्य आहे. प्रत्येकाने धर्माचे आचरण करावे म्हणजेच, बाळाचे पालन, पोषण करणे आईचे धर्म कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी मार्गदर्शन करणे हे गुरुचे कर्तव्य आहे. तसेच रुग्णांना योग्य उपचार करून सेवा देणे हा डॉक्टर आणि वैद्यांचा धर्म आहे. परंतु रुग्ण सेवा करताना रुग्णाबाबत जातीभेद अथवा धर्मभेद असा भेदभाव नसतो. मानवता जपणे आणि वाढीस लावणे हेच डॉक्टरांसह सर्व नागरिकांचे धर्म कर्तव्य आहे. प्रत्येकाची प्रथम गुरु आई असते. द्वितीय गुरु कुटुंब आणि तृतीय गुरू समाज असतो. या समाजाचा म्हणजेच राष्ट्राचा विकास होण्यासाठी एबीसीडी म्हणजे (ए-अटॅचमेंट) भावनिक नाते, (बी-बाँडनेस) संबंध, (सी-केअर) काळजी आणि (डी-डेडीकेशन) समर्पण या चार व्हिटॅमिनची गरज आहे. याचा योग्य समन्वय साधून विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सामाजिक संस्था शिक्षा, संस्कार, संस्कृती या क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राष्ट्र उभारणीसाठी काम करीत आहेत. यामध्ये सर्व देशवासीयांनी योगदान द्यावे असेही आवाहन डॉ. सिंह यांनी यावेळी केले.
डॉ. सिंह यांचे तुकाराम महाराज पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ देऊन डॉ. रोहिदास आल्हाट यांनी स्वागत केले. सूत्र संचालन डॉ. संदीप कवडे यांनी तर आभार डॉ. शंकर गोरे यांनी मानले.