Home Politics विशाल पाटील यांना राज्यसभेत पाठविण्याची महाविकास आघाडीची तयारी

विशाल पाटील यांना राज्यसभेत पाठविण्याची महाविकास आघाडीची तयारी

विशाल पाटील यांना राज्यसभेत पाठविण्याची महाविकास आघाडीची तयारी
xr:d:DAGAqx_Vwfk:15,j:3005449838328336009,t:24032712

सांगली: प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार विशाल पाटील यांना राज्यसभा सदस्यत्व देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कडून केला जात असून तसा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ हा वादाचे कारण ठरला आहे. शाहू महाराजांसाठी आपला कोल्हापूर मतदारसंघ आपण काँग्रेसला दिला असून त्या बदल्यात सांगली मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी केवळ मागणी करून न थांबता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ही जाहीर करून टाकली.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या जागेवर आमचाच उमेदवार असणार, असा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांना शांत करण्यासाठी विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी महाविकास आघाडीने दाखवली आहे. दुसरा पर्याय म्हणजे, विशाल पाटील यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यास त्यांना महाविकास आघाडी पूर्ण पाठिंबा देईल, असा प्रस्तावही महाविकास आघाडीने मांडला आहे.. हे दोन्ही प्रस्ताव काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांनी हे प्रस्ताव स्वीकारले तरीही स्थानिक नेते कार्यकर्ते ते मान्य करणार का हाच खरा सवाल आहे.