सांगली: प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यामुळे नाराज असलेले काँग्रेस नेते विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. दोन दिवसात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे.
छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यासाठी कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला देण्याच्या बदल्यात सांगली मतदारसंघावर दावा करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसचे विशाल पाटील, विश्वजीत कदम हे उमेदवारीचे दावेदार व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते संतप्त आहेत.
सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात काँग्रेसच्या सातत्याने बैठका घेतल्या जात असून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या पवित्र्यात आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने आघाडी स्थापन करून या आघाडीच्या झेंड्याखाली सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्धार आहे. काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मिळावी हा त्यांचा आग्रह कायम असला तरीही दोन दिवसात पक्षाने निर्णय न घेतल्यास ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिनांक 16 रोजी भव्य रॅलीचे आयोजन करून शक्ती प्रदर्शन करण्याचेही त्यांचे नियोजन आहे.