मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदावर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पदासाठी आग्रही नाही. महाविकास आघाडी अखंड राहणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, आमदार संख्या बाबत स्पष्टता येईपर्यंत थोडी वाट पहा, असे आवाहन नवनियुक्त विरोधी पक्ष नेते आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसला केले आहे.
शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावरून अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी किती आमदार आणि अजित पवार यांच्या पाठीशी किती, याबाबत अध्यक्ष संदिग्धता आहे. अशा परिस्थितीतच विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते पदाबाबत सबुरी बाळगण्याचा सल्ला काँग्रेसला दिला आहे. सध्या किती आमदार कोणाकडे हे सांगता येत नसले तरीही ही बाब काही काळातच स्पष्ट होईल. शरद पवार यांच्या कराड दौऱ्यामध्ये त्यांना कार्यकर्त्यांकडून, विशेषतः युवा कार्यकर्त्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता बंडाचा विचार करणाऱ्या आमदारांच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.
आपल्यासाठी महाविकास आघाडी अखंड राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाबाबत आग्रही राहून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी करणार नाही, असे सांगत आव्हाड यांनी शरद पवार यांनी काल घेतलेल्या भूमिकेचा पुनर उपचार केला. विरोधी पक्षनेता हे पद पाठिंबा असलेल्या आमदारांच्या संख्येवरून ठरत असल्याने काँग्रेसच्या खासदारांची संख्या अधिक झाली असेल तर त्यांची या पदासाठीची मागणी वावगी मानण्याचे कारण नाही, असे पवार यांनी कालच स्पष्ट केले आहे.