मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दीर्घकाळ रिक्त असलेले विधानसभा विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसचे विदर्भातील वजनदार नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना त्यांना वगळून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने वडेट्टीवार यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी महाविकास आघाडीची कास सोडून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. त्यापूर्वी अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. अजित पवार यांच्या बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ घटले आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक ठरले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेस कडे जाणार हे निश्चित झाले. मात्र ही जबाबदारी कोण निभावणार याचा निर्णय दीर्घकाळ लांबणीवर पडला. पावसाळी अधिवेशन सुरू झाले तरीही विरोधी पक्षनेते पदावर कोणाचीच निवड होत नव्हती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदावर संग्राम थोपटे, माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा होती. सत्ताधारी पक्षाकडे भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार असे दिग्गज नेते असताना विरोधी पक्ष नेते पदावर आक्रमक आणि सर्वसमावेशक नेत्याची निवड करणे काँग्रेससाठी आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींनी वडेट्टीवार यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये देखील विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी पार पाडली आहे.