Home Politics विरोधकांच्या एकजुकीसाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

विरोधकांच्या एकजुकीसाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

विरोधकांच्या एकजुकीसाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

नवी दिल्ली: प्रतिनिधी

सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजपविरोधी पक्षांची एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘डिनर डिप्लोमसी’चा अंगीकार केला आहे. विरोधी पक्षांच्या पुढील बैठकीच्या आदल्या रात्री त्यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींना मेजवानीसाठी आमंत्रित केल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लगाम घालण्यासाठी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन पाटणा येथे पहिल्या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसला तरी आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतला. या बैठकीत देशभरातील पंधरा पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

विरोधी पक्षांच्या नियोजित आघाडीची पुढील बैठक हिमाचल प्रदेशात दिनांक १८ जुलै रोजी होत आहे. या बैठकीत देशभरातील किमान आठ प्रादेशिक पक्ष आघाडीत नव्याने सहभागी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आम आदमी पक्षालाही निमंत्रण

पाटणा येथील विरोधकांच्या पहिल्या बैठकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये खडाजंगी झाली. दिल्लीतील प्रशासकीय अधिकार राज्य सरकारकडून काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेच्या विरोधात काँग्रेसने उघड भूमिका घ्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने लावून धरली. या मुद्द्यावर काँग्रेस जोपर्यंत ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत विरोधी आघाडीच्या बैठकीला हजेरी लावणार नाही असा इशाराही आम आदमी पक्षाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आगामी बैठकीच्या आदल्या दिवशी सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला आम आदमी पक्षालाही निमंत्रण देण्यात आले आहे.