‘पीसीसीओईआर’ मध्ये ‘आविष्कार २०२२’ स्पर्धा उत्साहात
पिंपरी, पुणे (दि. १० नोव्हेंबर २०२२) – महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज महिला अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ध्येय, चिकाटी, सहनशिलता हे उपजत गुण विद्यार्थ्यांमध्ये आहे. यातूनच दर्जेदार संशोधन निर्मिती होते असे मत भारतीय महसूल सेवा आयकर विभागाचे उपायुक्त किरण शिंदे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातर्फे संशोधनावर आधारीत ‘आविष्कार -२०२२’ स्पर्धेचे आयोजन नुकतेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरींग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर ) येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन उपायुक्त किरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीमुळे देश पुढील काही वर्षांमध्ये जागतिक महासत्ता बनेल. आविष्कार स्पर्धेत विद्यार्थिनींचा अधिक प्रतिसाद मिळाला हे पाहून खूप आनंद आणि समाधान वाटते, असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रतिनीधी डॉ. मोहन वामन, समन्यवक डॉ. राहुल मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागील पंधरा वर्षांपासुन ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन करते याची माहिती अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) संचालक संजय ढोले यांनी दिली. या स्पर्धेमध्ये विद्यापीठांतील सत्तर महाविद्यालयातील अडीचशे संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. तज्ज्ञ प्राध्यापकांनी या प्रकल्पांचे परिक्षण केले.
पीसीसीओईचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. आरती टेकाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.