
पुणे: प्रतिनिधी
आपण वयाच्या साठाव्या वर्षी पक्ष नेतृत्वाला अमान्य असणारी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, काहींनी वयाच्या केवळ 38 व्या वर्षी बंडाचा झेंडा उभारला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांचे सरकार उलथवल्याचा संदर्भ या टीकेला आहे. मात्र, आपण केलेली कृती ही बंड नव्हे तर सर्वांनी एकत्र बसून घेतलेला निर्णय होता, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
वसंत दादा पाटील यांचे सरकार चांगले काम करीत होते. तरीही त्यांना बाजूला सारण्यात आले, असा आरोप अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केला होता. त्यावर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण केले ते बंड नव्हते. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय विचारधारेचे अनुसरण करून सर्व समविचारी लोकांनी एकत्रितपणे घेतलेला तो निर्णय होता, असा दावा पवार यांनी केला.
आपल्या त्या निर्णयाबद्दल आता कोणी तक्रार करण्याचे काहीही कारण नाही. त्याचप्रमाणे आत्ता ज्या कोणी काही केले आहे त्याबद्दलही आपली कोणाबद्दल तक्रार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती कशी झाली, कोणी केली याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यावर कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
तुम्ही आजपर्यंत इतरांचे अनेक वर्षापासून ऐकले. या पुढच्या काळात इतर कोणाचे ऐकू नका. केवळ आपण सांगू ते ऐका, असे अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना सांगितले. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील दहा ते पंधरा वर्षापासून आपण बारामती मध्ये लक्ष घातलेले नाही. नव्या दमाच्या स्थानिक नेतृत्वाला वाव देण्याचे आपले धोरण राहिले आहे. त्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चात्ताप नाही.