पुणे: प्रतिनिधी
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात आज बार्टीच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले. एक जानेवारी २०२४ शौर्य दिना करिता भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात ६० लाख रुपये खर्च करून फक्त ५० हजार लोकांना जेवण पुरविण्याचा भोजन ठेका रद्द करण्यात आला. तसेच पोलीस भरती निवासी प्रशिक्षणाला या करिता तीन महिने मुदतवाढ तात्काळ देण्यात आली .
Mphil ते Ph.D करण्याकरिता २०२१ सालच्या ४९ विद्यार्थ्यांना Ph.D फेलोशिप करिता पात्र करण्यात आले.
२०२२ च्या सर्व ७६१ विद्यार्थ्यांना बार्टी प्रशासनाकडून फेलोशिप मंजूर करून घेण्यात आली तसेच आर्थिक तरतुदीकरीता सकारात्मक प्रस्ताव देखील बार्टीच्या वतीने शासनास पाठविण्यात आलेला आहे.
बार्टी प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यात आली तसेच बार्टीचे नेमके उद्देश काय हे त्यांना समजून सांगण्यात आले. बार्टीचे उद्देश लिहिलेला एक फलक वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बार्टी प्रशासनालाच भेट देण्यात आला. बार्टी ही स्वायत्त शिक्षणसंस्था असून संशोधक विद्यार्थी घडवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु बार्टी मधील अधिकारी या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक करताना आमच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन सगळे प्रश्न आज निकाली काढण्यात आलेले आहेत. तसेच इथून पुढच्या काळात देखील ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांवर अन्याय होईल त्या त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. हा लढा आता सुरू झालेला असून या लढ्यामध्ये अनेक टप्पे अजून बाकी आहेत, याची जाणीव प्रशासनाला करून देण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लघुपट महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ६ वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास अभिनेत्री गार्गी कुलकर्णी या उद्घाटक म्हणून असणार आहेत त्यांना तब्बल ८ लाख रुपये मानधन या कार्यक्रमासाठी देण्यात येणार होते. आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ते मानधन तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी तात्काळ ही मागणी मान्य करून पुढील पैसे देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. तसेच इथून पुढच्या काळामध्ये अनुसूचित जाती जमातीतील तरुणांना, तरुणींना, कलावंतांना वाव देण्याचे काम बार्टीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे महासंचालक सुनील वारे यांनी कळविले. चांगले कलावंत घडविण्याकरिता बार्टीच्या वतीने प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम हाती घेण्याचा सुद्धा त्यांनी निर्धार केला आहे.
यावेळी राज्य कार्यकारी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरेपाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी, राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड.अफरोज मुल्ला, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड सर्व अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.