
मुंबई: प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मतदान केल्याने भारतीय जनता पक्षाला फायदा होणार असून त्याचा फटका पुरोगामी पक्षांना बसणार आहे. त्यामुळे या पक्षांना मतदान न करता महाविकास आघाडीला सुमोच द्या, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे.
आत्ताची निवडणूक हा हुकूमशाहीच्या विरोधातील संविधान वाचविण्याचा लढा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून महाविकास आघाडीला साथ दिली असती तर या लढ्याला बळ मिळाले असते. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. त्यांच्याशी आपले मित्रत्व आहे तरीही त्यांनी भाजपला पोषक भूमिका घेतल्यामुळे ते टिकेला पात्र आहेत असेही गांधी यांनी नमूद केले.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ‘ गद्दारांची महायुती असलेल्या भाजप आणि मित्र पक्षांचा फायदा होणार आहे. हा फायदा टाळण्यासाठी आणि पुरोगामी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मतदारांनी वंचित आणि एमआयएम ला मतदान न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन गांधी यांनी केले आहे.